Ajit Pawar Gadchiroli Visit Pawar
महाराष्ट्र

Ajit Pawar: 'विमान ढगात गेलं आणि माझ्या पोटात...' गडचिरोली दौऱ्यावर असताना अजित दादांनी सांगितला होता किस्सा

Ajit Pawar Gadchiroli Visit: गडचिरोली दौऱ्यातील एका प्रवासाची आठवण आज पुन्हा मन हेलावून टाकते. विमान ढगात शिरल्यावर “पोटात गोळा आला” असे अजित पवारांनी हसत सांगितले होते.

Rahul Shelke

Ajit Pawar Shared A Memorable Experience During Gadchiroli Visit:

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज बुधवारी सकाळी 8:46 वाजता विमान अपघातात निधन झाले. विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. बारामतीमध्ये लँडिंग करताना विमान धावपट्टीवरून घसरले आणि त्याला आग लागली. विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण बारामती परिसरात शोककळा पसरली आहे. शहरात बंदची घोषणा करण्यात आली आहे. जवळजवळ सर्व दुकाने बंद आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा सडेतोड आणि निर्णयक्षम नेता म्हणून ओळखले जाणारे अजित पवार काही क्षणांत अत्यंत हळवेही होत. गडचिरोली दौऱ्यातील अशीच एक आठवण त्यांनी सांगितली होती.

17 जुलै 2024 रोजी नागपूरहून गडचिरोलीकडे जात असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच विमानात प्रवास करत होते. पावसाळ्याचे दिवस, ढगाळ वातावरण आणि अचानक विमान ढगांमध्ये शिरले. त्या क्षणाचे वर्णन अजित पवारांनी नंतर एका सभेत अगदी मोकळेपणाने, हसत-हसत केले होते.

“विमान ढगात गेलं आणि माझ्या पोटात गोळा आला,” असे सांगताना त्यांनी त्या क्षणाला वाटणारी भीती सांगितली होती. “काही वेळासाठी जीव मुठीत आला होता,” असेही त्यांनी सांगितले होते. मात्र, त्याच वेळी त्यांच्या शेजारी बसलेले देवेंद्र फडणवीस मात्र निवांतपणे गप्पा मारत होते, असे अजित पवारांनी हसत सांगितले होते.

तेव्हा फडणवीस म्हणाले होते, “दादा, घाबरू नका. माझे आतापर्यंत सहा अपघात झाले आहेत; पण मी विमानात असलो की काही होत नाही,” असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला होता. त्यावर अजित पवारांनीही, “ही तुमच्या पूर्वजांची पुण्याई असणार,” असे म्हणत तो विषय हलक्याफुलक्या शब्दांत संपवला होता.

आज मात्र हाच किस्सा आठवताना अनेक कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले. त्या दिवशी गडचिरोलीच्या पावसाळी ढगांवर मात करणारे अजित पवार, आज बारामतीच्या आभाळाखाली हरपल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात दाटून आली आहे.

नियतीचा खेळ किती विचित्र असतो, याची जाणीव करून देणारी ही आठवण आहे. ज्या विमानप्रवासाच्या भीतीबद्दल दोन वर्षांपूर्वी अजित पवार मोकळेपणाने, हसत-खेळत बोलले होते, त्याच प्रवासाने आज त्यांच्या आयुष्याची अखेर झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT