वाळकी : पुढारी वृत्तसेवा
हॉटेल व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्याकडील एक लाख 67 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटणार्या आरोपीला नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. सुधीर बाबासाहेब सायंबर (वय 30 रा. पारोडी, ता. आष्टी, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील हातवळण ते रूईछत्तीशी रोडवरील रुईछत्तीशी शिवारात ही घटना घडली होती.
सहा जणांनी व्यावसायिक रघुनाथ एकनाथ मेटे (वय 50 रा. हनुमाननगर, नगर-दौंड रोड, नगर) यांना लुटले होते. मेटे यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तलवारीचा धाकवून लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. मेटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक तपासाच्या मदतीने सर्व आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी एक आरोपीस बुधवारी (दि.1) अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयाने 4 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक युवराज चव्हाण, सहायक फौजदार दिनकर घोरपडे, भालसिंग, साठे यांनी ही कारवाई केली.