अहमदनगर

सिद्धटेक : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला तिघांचा चावा, उपचारासाठी नगरला हलवले

अमृता चौगुले

सिद्धटेक : पुढारी वृत्तसेवा : भांबोरा व दुधोडी (ता. कर्जत) येथे पिसाळलेल्या कुत्र्याने तिघांना चावा घेतला असून, तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जखमीमध्ये एका चार वर्षीय मुलाचाही समावेश आहे.
दुधोडी येथील बालक निनाद अस्लम सय्यद (वय 4) हा घराच्या अंगणात खेळत असताना कुत्र्याने त्याला चावा घेऊन जखमी केले.

तेथून त्याने पळ काढून भांबोर्‍याचे (हनुमाननगर) रहिवासी प्रमोद संभाजी शेळके मोटारसायकलवर कामानिमित्त गावामध्ये जात असताना गाडीचा पाठलाग करून उडी मारून पायाचा चावा घेतला. यात ते जखमी झाले आहेत. येथून पुढे दत्तनगर (भांबोरा) येथील गणेश शंकर दळवी यांच्या घरी प्रवेश करून त्यांचा चावा घेतला. तेही जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती सोशल मीडिया, मोबाईलद्वारे नागरिकांनपर्यत पोहचविण्यात आली. पुढे कोणता धोका होऊ नये, म्हणून पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेऊन नागरिकांनी त्याला मारले. यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. यानंतर पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे जखमींना तातडीने व वेळेत योग्य उपचार होणे गरजेचे असते, नाहीतर त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. कधी कधी तो जीवघेणा ही ठरू शकतो.

यामुळे सर्व जखमी तातडीने जवळील बारडगाव सुद्रिक आरोग्य उपकेंद्रात दाखल करण्यात आले. परंतु येथे यावरील इंजेक्शन उपलब्ध नसल्याने राशीन किंवा कर्जत आरोग्य उपकेंद्रात जाण्याचा सल्ला आरोग्य अधिकार्‍यांनी दिला. यानंतर पुन्हा सर्व जखमी राशीन व कर्जत आरोग्य उपकेंद्रात गेले. येथेही आरोग्य अधिकार्‍यांने सांगितले की, येथेही उपचारांची सुविधा नाही.

'तुम्ही अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात जावा.' यामध्ये बराच वेळ गेला, शेवटी संध्याकाळी एका खासगी गाडीने सर्व जखमींना नगरला नेण्यात आले. येथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. उपचार सुरू असताना एका जखमीला रुग्णालयातील लस लागू पडली नाही, म्हणून त्यांना खासगी मेडीकलमधून चार हजार रुपये मोजून लस घ्यावी लागली. यामध्ये तालुका पातळीवर उपचार, लस उपलब्ध असती, रुग्णांचा वेळ, पैसा व मानसिक त्रासही वाचला असता, असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

तालुका पातळीवर सुविधा मिळावी
कुत्रा चावल्यानंतरची उपचार सुविधा व लस तालुका पातळीवरील आरोग्य उपकेंद्रात उपलब्ध व्हावी, यासाठी खासदार डॉ. सुजय विखे व आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी जखमींच्या कुटुंबीयांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT