संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर शहरामधून जाणार्या पुणे – नाशिक महामार्गालगत बांधकाम विभागांतर्गत विश्रामगृह इमारत साठलेल्या पाण्याच्या ठेढ्यात सापडल्याने हे वातावरण आलेल्या पाहुण्यांच्या आरोग्याला त्रासदायक वातावरण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या पावसाळा असल्याने केव्हा पाऊस येईल, यांची शाश्वती नसते.
संगमनेर शहरात बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय असल्याने पाच तालुक्यांचे कामकाज चालू आहे. येथे कार्यकारी अभियंता, तालुकास्तरीय अभियंता, सहाय्यक अभियंत्यासह कर्मचारी कार्यरत आहेत. संगमनेर शहर हे पुणे – नाशिक या मोठ्या जिल्ह्यांच्या महामार्गालगत असल्याने राजकीय, सामाजिक, धार्मिक, सहकार, कलावंतांसह उद्योजकांची येथे मोठ्या प्रमाणात रेलचेल सतत असते. बांधकाम विभागाने महामार्गाशेजारी दिमाखदार, देखणी इमारत उभी केली.
इमारतीसमोरील बाजूस काचेचा दरवाजा, पोर्च, समोर गोलाकार बगीचा निर्माण केला. यामुळे हे विश्रामगृह सुंदर दिसते. मात्र, इमारतीच्या पूर्व – पश्चिम व मागील बाजू (दक्षिणेस) खोलगट भाग असल्याने तेथे सातत्याने पाण्याचे डबके साठते. इमारतीच्या मागील बाजूस दुर्गंधी येते. डासांचे प्रमाण वाढल्याचे दिसते. बांधकाम विभागाच्या माध्यमातून अनेक विकासात्मक कामे मार्गी लावले जात असताना बांधकाम कार्यलय, विश्रामगृहाभोवतीचे डबके, अस्वच्छता हे निर्माण झालेले एक कोडे आहे.
संगमनेर हे सर्वसंप्रन्न तालुका म्हणून परिचित आहे. मात्र, व्हीआयपी पाहुण्यांना जर डासांची भूणभूण अन् दुर्गंधीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. उन्हाळ्यामध्ये या समस्येची प्रचिती येत नाही. मात्र, हिवाळा व पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची चर्चा ऐकू येते. या विश्रामगृहात, विविध क्षेत्रांतील अधिकारी, कर्मचारी, राजकीय पुढारी येतात.
अक्षम्य दुर्लक्ष..!
समोरून दिसणार्या सुंदर इमारतीत डासांच्या साम्राज्यासह दुर्गधी कोठून येते, अशी निराशाजनक विचारणा होते. मात्र, या समस्येकडे अधिकार्यांचे दुर्लक्ष असल्याचे वास्तव चित्र दिसत आहे.
झाडे उखडली, पण पाहुणे बचावले..!
वादळी वार्यासह झालेल्या पावसामुळे बांधकाम विभागाच्या इमारतीच्या अवतीभोवतीची छोटी – मोठी झाडे अक्षरशः उखडली. यामध्ये अनेक वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने पावसामुळे इमारतीच्या आश्रयास असलेल्या पाहुण्यांना कुठलीही इजा झाली नाही. हा प्रकार केवळ निष्काळजीपणामुळेच घडल्याचे दिसत आहे.