अहमदनगर

संगमनेर : महाराष्ट्राच्या योगासन संघाचे सराव शिबीर संगमनेरात सुरू

अमृता चौगुले

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा

योगासनांचे भारतातील स्थान खूप उच्च आहे. आता त्याला राष्ट्रीय खेळाची मान्यताही प्राप्त झाली. त्यामुळे इतर खेळांप्रमाणे योगासनपटूंनाही राज्य सरकारचा छत्रपती पुरस्कार मिळावा, यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

पुढील महिन्यात हरिणायातील पंचकुला येथे खेलो इंडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सहभागी होणार्‍या महाराष्ट्राच्या योगासन संघाचे सराव शिबीर संगमनेरात सुरू आहे. या स्पर्धेत सहभागी होणार्‍या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी मंत्री थोरात ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये आले होते. यावेळी ते बोलत केले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, अर्जुन पुरस्कारप्राप्त कुस्तीपटू काका पवार, तहसीलदार अमोल निकम, ज्येष्ठ उद्योगपती राजेश मालपाणी, ध्रुव ग्लोबल स्कूलचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, प्राचार्या अर्चना घोरपडे उपस्थित होते.
मंत्री थोरात म्हणाले की, डॉ.संजय मालपाणी यांनी ध्रुव ग्लोबल स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देवून पुढील पिढी सक्षम घडवण्याचा ध्यास घेतला आहे.

आपल्या मुलांमध्ये चांगले गुण असतात. हे कधी कधी पालकांच्याही लक्षात येत नाहीत. मात्र, अशा विद्यार्थ्यांतील गुण ओळखून त्यांना योग्य प्रशिक्षण मिळाल्यास ते सुद्धा स्पर्धेत यशस्वी होऊ शकतात. योगासनांचा राष्ट्रीय खेळात समावेश झाल्यानंतर आता राज्याच्या छत्रपती पुरस्कारांमध्येही त्याचा समावेश व्हावा, यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मंत्री थोरात यांनी दिली.

हरियाणात खेलो इंडिया स्पर्धेत 20 विद्यार्थी संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचे आहेत. या स्पर्धेत सहभागी होणार्‍या महाराष्ट्राच्या संघाचे प्रशिक्षण शिबीर सध्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये सुरू आहे. स्पर्धकांनी योगासनांची चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर करताना उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. योगासन प्रशिक्षक मंगेश खोपकर यांचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.

SCROLL FOR NEXT