अहमदनगर

राहुरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन 17 वर्षीय कॉलेज युवतीचा हात धरुन, तिच्या सोबत फोटो काढून विनयभंग केला. दरम्यान, घरच्या लोकांना मारून टाकण्याची धमकी दिल्याची घटना शहरातील कॉलेज रोड परिसरात घडली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडिलांनी अक्षय नाना सपकाळ याच्या विरुद्ध राहुरी पोलिसात फिर्याद दिली. 22 फेब्रुवारी रोजी पिडित मुलगी कॉलेजच्या गेट जवळ उभी होती.

यावेळी अक्षय तिच्याजवळ आला. तिचा हात धरून त्याने छेड काढली. माझ्यासोबत चल असे तो तिला म्हणाला. त्याचवेळी तिच्या सोबत फोटो काढून, तू दुसर्‍या कोणाबरोबर लग्न केले तर मी तुझे फोटो त्यांना दाखवून तुझे लग्न मोडील. तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, अशी जिवे मारण्याची धमकी दिली होती.

अक्षय पिडीत मुलीला व तिच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी देत असल्याने मुलीने याबाबत कोणाला काही सांगितले नव्हते. नंतर अक्षयने मुलीच्या वडिलांना फोन करुन धमकी दिली. तेव्हा मुलीने वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे 8 जून रोजी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अक्षय नाना सपकाळ (रा. गौटुबे आखाडा, ता. राहुरी) याच्या विरोधात विनयभंग व मारण्याची धमकी दिल्यासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे व पोलिस उप निरीक्षक निरज बोकील करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यात या प्रकारणांच्या घटना वाढत आहेत.

SCROLL FOR NEXT