अहमदनगर

मगर यांच्या शिरपेचात कर्नलचा मुकुट

अमृता चौगुले

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा

केडगाव येथील सुपुत्र विकास हरिभाऊ मगर यांना सैन्यदलातील उल्लेखनीय व नावीन्यपूर्ण कार्याबद्दल कर्नलपदी पदोन्नती मिळाली असून, त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये अटॅक हेलिकॉप्टर स्कॉर्डनचा पदभार स्वीकारला आहे. कर्नल मगर यांना लहानपणापासूनच सैन्यदलाची आवड होती.

मूळचे वाघुंडे (ता. पारनेर) येथील रहिवासी असणारे विकास मगर यांचे वडील हरिभाऊ मगर हे पोस्ट खात्यात नोकरीनिमित्त केडगावला स्थायिक झाले. केडगाव येथील प्राथमिक शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. सहावीला त्यांनी सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेतला. बारावीपर्यंत सैनिक स्कूलचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची (एनडीएची) परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.

खडकवासला येथील एनडीएमध्ये तीन वर्ष, तर डेहराडूनला एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 2005 मध्ये त्यांची सैन्यदलात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली. कर्नल मगर यांनी त्यांच्या सैन्यदलातील कार्यकाळात अप्रतिम देश सेवा केल्याबद्दल विविध पदके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. श्रीनगर येथे कार्यरत असताना काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशनसाठी जनरल ऑफिसर इन चीफ कमांडेशन कार्ड मिळाले.

पूरग्रस्तांसाठी त्यांच्या नेतृत्वाखालील हेलिकॉप्टर पथकाने अनेकांचे जीव वाचवत देशसेवा केली होती. या कार्याची दखल घेऊन कर्नल कमांडट सर्टिफिकेट मिळाले. पुढे आर्मी हेडकॉटरमध्ये कार्यरत असताना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत संरक्षण विभागाने त्यांची व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमांडेशन कार्ड मिळाले. कर्नल विकास मगर यांचे वडील पोस्ट खात्यात, तर आई गृहिणी आहेत. कर्नल विकास मगर यांच्या पत्नी अनुराधा मगर या इंजिनीअर असून, त्यांना दोन मुली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT