अहमदनगर

भूवैज्ञानिक शोधताहेत बोरबनवाडीत भूकंपसदृश धक्क्यांची कारणे

अमृता चौगुले

बोटा : पुढारी वृत्तसेवा

संगमनेर तालुक्यातील पठार भागात बोटा, माळवाडी व घारगाव, बोरबनवाडी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून भूकंपसदृश सौम्य, तसेच तीव्र धक्के बसल्याच्या घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर काही भूकंप धक्क्यांसह काळदरा डोंगर ओढ्यातील खडकांना गेलेले तडे व सराटी येथे जमिनीला पडलेल्या भेगा यासंदर्भात पुणे येथील भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या पथकाने पाहणी केली.

या माहितीच्या आधारे अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात येईल, असे पथकातील अधिकार्‍यांनी सांगितले. सन 2019 सालच्या नोव्हेंबर महिन्यात काळदरा डोंगराच्या ओढ्यातील खडकांना अनेक ठिकाणी तडे गेले होते. या परिसरातील विहिरींचे पाणी नष्ट झाले होते. या प्रकाराबाबत संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी डोंगराची पाहणी करून भूगर्भ तज्ज्ञांशी पत्रव्यवहार केला होता. यानंतर नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंप कक्षाच्या वैज्ञानिक अधिकारी चारुलता चौधरी यांनी भेट दिली.

दरम्यान, मेरी संस्थेच्या यंत्रावर भूकंपाची नोंद झाली नाही. भूगर्भीय शास्त्रज्ञांनी निरीक्षण करणे गरजेचे असल्याचे चौधरी यांनी सांगितले होते. विशेष असे की, मध्यंतरी दोन वर्षे या प्रकाराकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. याबाबतचे वृत्त दैनिक पुढारी व प्रसारमाध्यमातून प्रसारित झाल्यानंतर 1 एप्रिल रोजी अहमदनगरच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा विभागातील वरिष्ठ भूवैज्ञानिक रश्मी कदम यांनी सराटी येथे येऊन पाहणी केली. याबाबतचा अहवाल त्यांनी सादर केला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुणे येथील भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला अहवाल पाठविण्यात आला होता.

यानुसार शुक्रवारी, 3 जून रोजी सकाळी 11 वाजता पुणे येथील भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक मोनिका तारे यांसह पथकाने भेट देवून, या संपूर्ण परिसराची पाहणी केली. या सर्व बाबींचा अभ्यास करून त्यावर सविस्तर अहवाल सादर करणार असल्याचे तारे यांनी सांगितले. यावेळी बोरबन गावचे सरपंच संदेश गाडेकर, मंडलाधिकारी इरप्पा काळे, तलाठी दादा शेख, कोतवाल शशिकांत खोंड आदी उपस्थित होते.

ग्रामस्थ भयभीत..!

दि.9 फेब्रुवारी रोजी घारगाव परिसराला भूकंपसदृश धक्का बसला. 30 मार्च रोजी बोरबनवाडीच्या सराटी परिसरात टेकडवाडी येथील लोकवस्तीच्या ठिकाणी घरांच्या शेजारील रस्त्यावर दोन्ही बाजूंनी जमिनीला अचानक तीन दिवसांच्या अंतरावर सलग दोनदा 200 ते 250 फुटांपर्यंत अचानक भेगा पडल्या होत्या. या भेगांची लांबी वाढतच असल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT