अहमदनगर

पाथर्डी : आमदार राजळेंमुळे अपघातग्रस्तांना जीवदान

अमृता चौगुले

पाथर्डी शहर : पुढारी वृत्तसेवा:  कल्याण निर्मल राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील तनपुरवाडी येथे दोन दुचाकीस्वार समोरासमोर धडकल्याने मोठा आपघात होऊन दोघेही गंभीर जखमी झाले. त्याच वेळी मतदारसंघात प्रवास करीत असलेल्या आमदार मोनिका राजळे तेथे हजर झाल्या.

दोघांची गंभीर परिस्थिती पाहून त्यांनी काही क्षणात जखमींना स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात दाखल करून मोबाईलवरून तातडीने उपचार करण्याच्या सूचना रुग्णालयाला दिल्या. आमदार राजळे यांच्या प्रसंगावधानामुळे दोन्ही जखमींना जीवदान मिळाले आहे.
दोघांपैकी एकाची प्रकृती गंभीर व एकाची चिंताजनक आहे.

पाथर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे. दुपारी तालुक्यातील तनपूरवाडी गावाजवळ कल्याण निर्मल राष्ट्रीय महामार्गावर दिनकर आन्याबा वैरट (वय 38 रा.माजलगाव, जि. बीड) व निवृत्त मंडळाधिकारी रामभाऊ यादव बनसोडे (वय 70 रा.कसबापेठ, पाथर्डी) या दोन दुचाकीस्वरांची समोरासमोर जोरदार धडक झाली. दोघेही गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला पडले होते.

त्याच वेळी आमदार राजळे यांनी गर्दी पाहून थांबून चौकशी केली असता अपघात झाल्याचे समजले. ग्रामस्थांनी रुग्णवाहिका बोलाविली होती. मात्र, ती आली नव्हती. जखमींना उपचाराची तातडीने गरज असल्याचे आमदार राजळे यांच्या लक्षात आले. त्यांनी आपला नियोजित पुढील दौरा अर्धवट सोडून क्षणाचाही विलंब न लावता स्वतःच्या गाडीतून जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची सूचना चालक रमेश भुसारी व स्वीय सहायक दत्ता नरवणे यांना केली.

त्यांनी आ. राजळे यांच्या गाडीतून जखमींना अवघ्या पाच मिनिटांत रुग्णालयात दाखल केले. यावेळी आमदार राजळे यांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क करून तातडीने योग्य ते उपचार करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर दहा मिनिटांनी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. तोपर्यंत जखमींवर प्राथमिक उपचार सुरू झाले होते.आमदार मोनिका राजळे यांच्या प्रसंगावधान व समसूचकतेमुळे दोन गंभीर जखमी अपघातग्रस्तांचे प्राण वाचले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT