अहमदनगर

पाणी टंचाईची अशीही झळ, 56 हजार नगरकरांच्या घशाला पडली कोरड

अमृता चौगुले

नगर:  पुढारी वृत्तसेवा

मृग नक्षत्र अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपले आहे. अशा परिस्थितीत देखील जिल्ह्यातील 38 गावे आणि 125 वाड्यांतील 56 हजार लोकसंख्येचा घसा कोरडा पडला आहे. त्यामुळे जनतेला 26 टँकरव्दारे मोफत पाणीपुरवठा सुरु आहे. या पाणीटंचाईची झळ संगमनेरसह पाच तालुक्यांतील गावांना बसली आहे.

एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा सुरु झाला. या तडाख्यात संगमनेर तालुक्यातील पठार भागातील काही गावांना पाणीटंचाईचा फटका बसला. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरात प्रारंभी मोफत पाण्याचा टँकर सुरु करण्यात आला. आजमितीस या तालुक्यातील 19 गावे आणि 47 वाड्या वस्त्यांवरील 25 हजार 814 लोकसंख्येला पाणीटंचाईची झळ सहन करावी लागत आहे. पाणीटंचाईने बेजार झालेल्या या जनतेला 12 टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु आहे.

संगमनेरपाठोपाठ नगर तालुक्यात देखील पाणीटंचाईची झळ बसली आहे. या तालुक्यातील 6 गावे व 18 वाड्यांतील 9 हजार 337 लोकसंख्येला 5 टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु केला आहे. पारनेर तालुक्यातील 10 गावे आणि 44 वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसली आहे. या तालुक्यातील 12 हजार 427 लोकसंख्येला 5 टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु आहे.
अकोले तालुक्यातील 2 गावे आणि 15 वाड्यांतील जनतेला देखील पाणीटंचाईची झळ बसली आहे. या या टंचाईग्रस्त भागातील जनतेला 3 टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरु आहे.

SCROLL FOR NEXT