जामखेड : पुढारी वृतसेवा
जामखेड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती गणामध्ये जयंतीच्या निमंत्रणासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ व युवा नेत्यांच्या अनेक गावांत बैठका झाल्या. या बैठकी जयंतीच्या; परंतु पेरणी मात्र जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची झाली.
आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्सहात होण्यासाठी चांगलीच कंबर कसली होती. त्यांनी गट व गणानुसार राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्त्यांना नियोजन करण्यात सांगितले होते. यानुसार जयंतीसाठी नेते व कार्यकर्त्यांनी नियोजन केलेे.
त्यामुळे संपूर्ण तालुक्यात जयंतीचे भक्तिमय वातावरण तयार झाले होते. निमित्त होते जयंतीचे; मात्र कार्यकर्त्यांनी गटात व गणात स्वताची चाचपणी केली. त्यामुळे निवडणुकी पूर्वीच तीन गट व सहा पंचायत समिती गणात पक्षाच्या इच्छुक कार्यकर्त्यांनी पिंजून काढला. या हजेरी लावल्याने जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात राजकीय वातावरण निर्माण झाले.
तसेच जामखेड शहरात ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रभागात जाऊन नागरिकांना निमंत्रण दिले. यामध्ये माजी नगरसेवक, इच्छुक नगरसेवक, ज्येष्ठ नेते आदींनी हजेरी लावली.
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त गेल्या आठ दिवसात जिल्हा परिषद गट व गणात इच्छुक सकाळी सात वाजताच गावागाव जाऊन घोंगडी बैठकांचे आयोजन करत होते. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत निमंत्रण दिले.
आरक्षणाचा प्रश्न आजून सुटला नसल्याने इच्छुक नेते संभ्रमात आहेत. परंतु, ऐनवेळी उमेदवारी दिली, तर पळापळ नको म्हणून इच्छुक लग्नाला देखील सातत्याने दिसत आहेत.
आमदार रोहित पवार निवडून आल्यापासून त्यांच्यासाठी एकनिष्ठ काम कोण करत आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायत, सेवा सोसायटीमध्ये कोणत्या कार्यकर्त्यांचा वरचष्मा आहे, अशा कार्यकर्त्यांना आमदार पवार न्याय देणार का? हे पाहणे ऐस्तुक्याचे ठरणार आहे.