अहमदनगर

नगर : साडेचारशे किलो गोमांस जप्त

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील कोठला भागातून कुरेशी हॉटेलच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमधून 450 किलो गोमांस जप्त केले. मंगळवारी (दि.28) रात्री नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

सालीम बाकर कुरेशी (वय 19, रा. व्यापारी मोहल्ला) अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तोफखाना पोलिसांच्या हद्दीमध्ये कोठला भागात गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना खबर्‍याकडून मिळाली होती. त्यानुसार 28 जून रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कोठला भागातील कुरेशी हॉटेलच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमधून 67 हजार 500 रूपये किंमतीचे 450 किलो गोमांस, तसेच एक सुरी, लोखंडी सत्तूर असा एकूण 67 हजार 900 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल योगेश अशोक सातपुते यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय जपे हे करत आहेत. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ संदीप कचरू पवार, पोना शंकर चौधरी, पोकॉ योगेश सातपुते, पोना लक्ष्मण खोकले, पोना रविकिरण सोनटक्के, पोनासचिन आडबल, पोहेकॉ दत्तात्रय जपे, पोकॉ सचिन जगताप या पथकाने केली.

SCROLL FOR NEXT