अहमदनगर

नगर : संत एकनाथांच्या स्वागताला भगवानगड पालखीचे प्रस्थान

अमृता चौगुले

खरवंडी कासार : पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर येथे होणार्‍या आषाढी एकादशी यात्रेच्या उत्सवानिमित्त पांडुरंगाच्या भेटीसाठी संत भगवानबाबांच्या पालखी दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. यावेळी पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

पालखी सोहळ्याच्या प्रस्थानापूर्वी भगवान गडावर वामन महाराज भोसले यांची अंबोरा (ता. मंठा) येथून दिंडी गडावर आल्यानंतर भगवानगडाच्या पालखी प्रस्थानाची सुरुवात होते, ही भगवानबाबांपासून परंपरा आहे. प्रस्थानापूर्वी संत भगवानबाबांच्या समाधीचा अभिषेक व पादुकांचे पूजन गडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांनी केले.

यानंतर दर्शन सभागृहात पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली. महिला-पुरुष भाविकांनी रांगेत उभे राहून पादुकांचे दर्शन घेतले. दोन तासांचा दर्शन सोहळा आटोपल्यानंतर पालखी दिंडी सोहळ्याला निरोप देण्यात आला. मराठवाड्यात संत भगवानबाबांचा मोठा भक्तगण आहे. पंढरपूरपर्यंत सोहळ्यात 25 दिंड्या सामील होतात. त्यामुळे पंढरपूरमध्ये मोठ्या सख्येने वारकरी दिंडी असतात. पंढरपूरमध्ये जाऊन ही पालखी पुन्हा संत एकनाथांच्या पालखीच्या स्वागताला पंढरपूर बाहेर येते. तेव्हाच संत एकनाथांची पालखी पंढरपूरमध्ये प्रवेश करते. हा मान भगवानगडाला आहे. भगवानगडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठाच्या माध्यमातून तरुण कीर्तनकार तयार झाले आहेत. काही तरुण शिक्षण घेत आहेत. हे सर्व पालखी सोहळ्यात सामील होतात.

गडाची नाथ गुरू परंपरा

भगवानगड ते पंढरपूर आषाढी वारी दिंडी सोहळा संत भगवानबाबांनी भगवानगडाच्या स्थापनेपूर्वी नारायणगडाहून 1921मध्ये सुरू केला होता. संत भगवानबाबांच्या निवर्तनानंतर भगवानगडाचे द्वितीय मठाधिपती भीमसिंह महाराज यांनी ही परंपरा चालू ठेवली. 2003 मध्ये भगवानगडाचे तृतीय मठाधिपतीपदी डॉ. नामदेव शास्त्री झाल्यावर त्यांनी भगवानगडाच्या दिंडीचे दिव्य स्वरूपात पालखी सोहळ्यात रूपांतर करत पादुकांसाठी विशेष रथ तयार केला. भगवानगडाची नाथ ही गुरू परंपरा असल्याने पंढरपूरमध्ये संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचा प्रवेश होण्यापूर्वी आपल्या गुरू परंपरेची सेवा म्हणून संत एकनाथ महाराजांच्या पालखीला आडवे जाण्याचा मान भगवानगडाच्या पालखीला आहे.

दाळबट्टीचा महाप्रसाद

भगवान गडाहून पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी वारकर्‍यांना व भाविकांना दाळ बट्टीचा महाप्रसाद देण्यात आला. गेल्या 15 वर्षांपासून भगवानगडावरून पालखी प्रस्थानच्या दिवशी भानुदास जाधव, बाबुराव ढाकणे, गंगाधर ढाकणे, सखाराम खेडकर, गोरख सानप या भाविकांतर्फे महाप्रसाद देण्यात येतो.

SCROLL FOR NEXT