अहमदनगर

नगर : ‘शाळा क्रीडांगण’ संशयाच्या भोवर्‍यात!

Shambhuraj Pachindre

नगर पुढारी वृत्तसेवा : क्रीडांगण विकास योजनेसाठी जिल्ह्यातील 64 शाळांना प्रत्येकी 7 लाखांचा निधी मंजूर होऊन काही कामे सुरू असून बहुतांश पूर्णही झाली आहेत. आम्हाला अंधारात ठेवून 'नगर'हून काम वाटप झाल्याचे शिक्षक खासगीत सांगत आहेत. क्रीडा विभागाने 'आमचा काम देण्याशी काहीही संबंध नाही. ती जबाबदारी मुख्याध्यापकांची' असे म्हणत हात झटकले आहेत.

दरम्यान, ठेकेदाराकडून कोरे धनादेश मागणे, अर्धवट कामांची बिले काढणे, काम पूर्णत्वाचे दाखले मागणे या चर्चेमुळे आता विभागीय आयुक्तांनीच याबाबत चौकशी करावी, असा सूर उमटत आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षांत क्रीडांगण विकास योजनेतून 4 कोटी 48 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून 64 शाळांच्या क्रीडांगणाचे सपाटीकरण केले जाणार आहे.

त्यासाठी प्रत्येक शाळेला सरासरी 7 लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शाळेस निधी मिळत असल्याने तो मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनच्या संयुक्त बँक खात्यावर जमा होत आहे. त्यामुळे कामाचे टेंडर काढणे किंवा अन्य प्रकारे काम देण्याचे अधिकारही शाळेलाच अपेक्षित आहेत. मात्र चित्र वेगळेच आहे.

नगरच्या 'त्या' अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने 'तो' ठेकेदार ज्या शाळा या निधीसाठी पात्र ठरल्या, त्यांच्याकडे थेट जात आहे. वर्क ऑर्डर दाखवून हे काम मला केंद्राकडून मिळाल्याचे सांगत आहे. त्यानंतर तो मैदानाचे सपाटीकरण करतो. पुढे मुख्याध्यापकांकडून 'त्या' कंपनीच्या नावे 5 आणि दुसर्‍या टप्प्यात 2 लाखांचा धनादेश घेतो, अशी माहिती काही व्यथित शिक्षकांकडून 'पुढारी'च्या हाती लागली आहे.

अधिकारी-ठेकेदाराचा 'खेळ' ; 'त्या' शाळांचे मुख्याध्यापक 'बळीचा बकरा'?

खर्च हजारांत, बिले मात्र लाखांची!

क्रीडांगणाच्या सपाटीकरणासाठी प्रत्यक्षात 70 ते 80 हजार रुपये खर्च केला जातो. कुठे मुरुम टाकला जातो, तर कुठे आहे त्याच जागेवर सपाटीकरण केले जाते, असे सांगितले जात आहे. त्यामुळे एक लाखाहून कमी खर्चात होणार्‍या कामासाठी 7 लाखांचा खर्च केला जात आहे. अशाप्रकारे कामातही गोंधळ सुरू असताना त्यावर नियंत्रण कोणाचे, ठेकेदाराला अभय कोणाचे, असे अनेक प्रश्‍न समोर येत आहेत. मुख्याध्यापकच या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी करणार आहेत.

क्रीडा विभागाचा टेंडरशी संबंध नाही : बिले

ज्या अनुदानित शाळा आहेत, त्यांना क्रीडांगणासाठी अनुदान दिले जाते. त्या कामाचे टेंडर कोण करते माहिती नाही. मात्र, शाळेच्या मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनची ती जबाबदारी असते. कामाच्या टेंडरबाबत किंवा काम कोणाला द्यायचे, याच्याशी क्रीडा विभागाचा कोणताही संबंध नाही, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी दिली.

  • 64 शाळांना प्रत्येकी 7 लाखांचे अनुदान
  •  पैसे शाळेच्या खात्यात, मग ठेकेदार नगरहून का?
  •  कामे कुणी वाटली; विभागीय चौकशीत 'भडका'?

या शाळांना 7 लाख रुपये मंजूर

कोपरगाव : करंजी, देर्डे चांदवड, संवत्सर, पढेगाव, मढी बु., कर्जत: औटेवाटी, परिटवाडी, तरडगाव, चांदे खुर्द, दुरगाव, दिघी, करमनवाडी, नागलवाडी, नेवासा : उत्सळ दुमाला, बकु पिंपळगाव, वरखेड,चांदा, संगमनेर : खंदरमाळ, जांबुत बुद्रुक, देवगाव, कोठे खुर्द, खांजापूर,चिकणी, राजापूर, श्रीगोंदेः कौठा, निमगाव खलू, कोळगाव, येळपणे, भिंगण खालसा, भानगाव, काष्टी, राहुरी : कोल्हार खुर्द, चांदेगाव, निंभेरे,अनापवाडी, कानडगाव, डिग्रस,रामपूर, नगरः कामरगाव, रांजणी, पारगाव मौला, नांदगाव, शेवगाव : ठाकूर निमगाव, जामखेड : दरडवाडी, पाडळी, खर्डा, भवरवाडी, महारौळी, वाकी, खांडवी,खर्डा मुले, जांबवाडी,धोंडपारगाव, पारनेर : देवी भोयरे, लोणी हवेली, जामगाव,ढवणवाडी, अकोले : तांभोळ, जाचकवाडी, ढोन्नरवाडी, लहीत खुर्द, राहाता : रांजणगाव खुर्द, श्रीरामपूर : टाकळीभान

समग्रच्या बँक खात्याचे 'त्या' ठेकेदाराने कोरे धनादेश मागितले होते. परंतु,आम्ही ते दिले नाही. शाळेच्या पटांगणात ठेकेदाराने थातूरमातूर काम केले आणि काम पूर्णत्वाचा दाखल मागितला. मात्र, हे आमच्या मनाला पटले नाही. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत आम्ही धनादेश देण्यास नकार दिला. सध्या ठेकेदार काम सोडून गेलेला आहे.
-एक मुख्याध्यापक

आमच्या शाळेच्या क्रीडांगण समपातळीसाठी शाळेला सात लाखांचा निधी मंजूर झाला. मात्र, हे काम कोणाला द्यायचे, त्याचे अधिकार आम्हाला दिले नव्हते. नगरच्या काही अधिकार्‍यांचा संदर्भ घेऊन एक ठेकेदार आला. त्याने हे काम मला दिले आहे, असे सांगितले. त्याने काम केले. त्याबदल्यात आम्ही त्याला पहिला पाच लाखांचा धनादेश दिला आहे.
-एक मुख्याध्यापक

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT