अहमदनगर

नगर : भंडारदरा जलसाठ्यात 169 दशलक्ष घनफूटची भर

अमृता चौगुले

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : नगर जिल्ह्यातील तीनही मोठ्या धरणांच्या पाणलोटात पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यासाठी जीवनदायी ठरलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठाही कासवगतीने वाढू लागला आहे. गेल्या चोवीस तासांत पाणलोटातील पावसाचा वेग काहीसा मंदावला आहे. भंडारदरा धरणाच्या जलसाठ्यात 169 दशलक्ष घनफुटांची भर पडली आहे.

मुळा, भंडारदरा व निळवंडे या तीनही मोठ्या धरणांसह बहुतेक सर्वच धरणांच्या पाणलोटात हजेरी लावली. त्यामुळे एकवेळ वातावरणीय बदलांमुळे मान्सूनच्या प्रवासात दीर्घकाळ खोळंबा झाल्याने चिंतातूर असतानाच लाभक्षेत्रातही बहुतेक सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात मान्सून बरसल्याने शेतकरी सुखावला आहे.

सध्या तालुक्यातील अनेक भागात खरिपाच्या पेरण्याची लगबग पाहायला मिळत आहे. अकोले तालुक्यातील दुर्गम भागातही आतापर्यंत चांगला पाऊस झाल्याने आदिवासी पाड्यात भातशेतीच्या मशागतीच्या कामांना वेग येऊ लागला आहे. अर्थात पाणलोटासह आदिवासी पट्ट्यात अजूनही पावसाला म्हणावा तसा जोर चढलेला नाही. मात्र, यंदा मुबलक प्रमाणात पाऊस होण्याची व तो दीर्घकाळ लांबण्याचीही शक्यता आहे.

अकोले तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात मान्सून टिकून असल्याने सह्याद्रीचे माथे हिरव्या रंगाचे शालू पांघरु लागले आहेत. त्यामुळे निसर्गाने आपले रुप बदलण्यास सुरुवात केल्याने पर्यटकांचे पायही आता हळूहळू धरणांच्या पाणलोटाकडे वळू लागले आहेत. चोवीस तासांत भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील घाटघर येथे 36 मिलीमीटर, रतनवाडीत 14 मिलीमीटर, पांजरे येथे 9 मिलीमीटर, भंडारदरा 8 मिलीमीटर, वाकी 4 मिलीमीटर, कोतूळ येथे 4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

तर, लाभक्षेत्रातील लोणी येथे 59 मिलीमीटर, शिर्डी 35 मिलीमीटर, श्रीरामपूर व ओझर येथे 32 मिलीमीटर, आश्वी 28 मिलीमीटर व संगमनेर येथे 2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत भंडारदरा धरणात 9 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. धरणातील पाणीसाठा 2 हजार 418 दशलक्ष घनफूट (21.90टक्के) झाला आहे. सध्या निळवंडे धरणात 3 हजार 552 दशलक्ष घनफूट (42.69टक्के), मुळा 8 हजार 335 दशलक्ष घनफूट (32.06 टक्के), आढळा 418 दशलक्ष घनफूट (39.43टक्के) व भोजापूर 21 दशलक्ष घनफूट (5.82 टक्के) इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण
मागील वर्षीप्रमाणेच लाभक्षेत्रातील संगमनेर तालुक्यात आतापर्यंत चांगला पाऊस झाला असून, वरुणराजाने जूनमधील सरासरी ओलांडली आहे. त्यासोबतच अकोले, राहाता, श्रीरामपूर, राहुरी व नेवासा तालुक्यातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मान्सूनच्या आगमनानंतर भंडारदरा धरणाच्या परिसरातील निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात या भागात येतात. गेल्या काही दिवसांपासून पाणलोटातील मान्सून सक्रिय असल्याने सह्याद्रीच्या डोंगरकपारीतून पाण्याचे ओहोळ धरणाकडे धावू लागले आहेत.

SCROLL FOR NEXT