अहमदनगर

नगर : प्रचाराच्या गाडीचे पैसे न दिल्याने कुटुंबास मारहाण

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : सन 2014 निवडणुकीत प्रचारासाठी लावलेल्या चारचाकी वाहनाचे पैसे दिले नाही. याचा राग मनात धरून एका कार्यकर्त्याला व त्याच्या कुटुंबातील लोकांना लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना राहुरी तालूक्यातील म्हैसगाव येथे घडली आहे.

अशोक दामोधर कर्डे (वय 35, रा. म्हैसगाव, ता. राहुरी) हा तरूण एका पक्षाचा कार्यकर्ता आहे. 2014 मध्ये त्याने आमदारकीच्या निवडणूकीत तहान भूक हरवून आपल्या पक्षासाठी काम केले. निवडणूकीच्या प्रचारासाठी अशोक कर्डे याच्यामार्फत एक चारचाकी वाहन भाडे तत्त्वावर लावण्यात आले होते. ते भाडेपोटी असलेले पैसे अद्याप त्या वाहन मालकाला मिळाले नाहीत. या गोष्टीचा राग धरून दोन आरोपींनी दिनांक 26 जून रोजी दुपारी सव्वा अकरा वाजे दरम्यान अशोक कर्डे यांच्या घरी जाऊन त्यांना व त्यांच्या पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी अशोक कर्डे यांचे वडिल, भाऊ, भावजय हे भांडण सोडवीण्यासाठी आले. तेव्हा आरोपींना लोखंडी गज व लाथा बुक्क्यांनी त्यांना मारहाण केली. तसेच तूला गाडीखाली घालून जिवे मारुन टाकतो, अशी धमकी दिली. या घटनेत अशोक कर्डे यांचे वडील दामोधर मनाजी कर्डे यांना दुखापत झाली असून त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी आरोपी पोपट लक्ष्मण आंबेकर (रा. कोळवाडी, ता. राहुरी) तसेच आणखी एक अनोळखी इसम अशा दोघांवर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गून्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक रामनाथ सानप हे करीत आहेत.

SCROLL FOR NEXT