अहमदनगर

नगर : ‘त्या’ शाळांची चौकशी होणार : पाटील

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : क्रीडांगण विकास योजनेतील 64 शाळा कामांच्या टेंडर प्रक्रियेविषयी सीईओ आशिष येरेकर यांनी चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार संबंधित तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकार्‍यांकडून याबाबतची माहिती घेऊन तो अहवाल सीईओंकडे सादर केला जाईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.

क्रीडांगण विकास योजनेतून 64 शाळांच्या मैदानाचे सपाटीकरण केले जात आहे. त्यासाठी प्रत्येकी 7 लाखांची तरतूद केलेली आहे. मात्र, क्रीडा विभाग या कामांचे टेंडर आपण केले नाही, असे सांगतो, तर शाळांचे मुख्याध्यापकही कामे आपण दिलीच नाही, असे कळवितात. त्यामुळे एकूणच या प्रक्रियेविषयी साशंकता निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने सीईओ आशिष येरेकर यांनी गांभीर्याने याप्रकरणाची दखल घेतली आहे.

सीईओ येरेकर यांनी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना शाळा कामाच्या टेंडर प्रक्रियेविषयी माहिती घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार पाटील यांनीही दुजोरा देताना सीईओंच्या सूचनेनुसार 'त्या' 64 शाळांचे अहवाल गटशिक्षणाधिकार्‍यांकडून बोलावले जाणार आहेत, अशी माहिती दिली.

मुख्याध्यापकांचे जबाब नोंदविणार?
शाळा व्यवस्थापन समितीचे मुख्याध्यापक हे पदसिद्ध सचिव आहेत. त्यामुळे क्रीडांगणचा निधी व्यवस्थापनच्या संयुक्त खात्यावर येत असेल, आणि त्याचा चुकीचा वापर झाला असेल, तर त्यासाठी मुख्याध्यापकही तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे आता याप्रकरणात मुख्याध्यापकांचे जबाब घेतले जाऊ शकतात, असेही सूत्रांकडून समजले.

SCROLL FOR NEXT