अहमदनगर

नगर : ‘त्या’ निर्णयाविरोधात न्यायालयीन लढा : नाहाटा

अमृता चौगुले

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंद्यासह कर्जत, पारनेर, करमाळा तालुक्यांसाठी वरदान ठरणार्‍या डिंभे ते माणिकडोह बोगद्यासंदर्भात घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे. या भागातील शेतकर्‍यांना देशोधडीला लावणारा आहे. या निर्णयाविरोधात आपण न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी दिली.

सभापती नाहटा म्हणाले, कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठे धरण म्हणून डिंभे धरण गणले जाते. त्याची पाण्याची उपयुक्त क्षमता 12.5 टीएमसी आहे. त्यावर उजवा आणि डावा, असे दोन कालवे आहेत! उजव्या कालव्यातून जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील शेतीचे सिंचन केले जाते. हे पुणे जिल्ह्यातील तालुके आहेत. डाव्या कालव्यातून पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व करमाळा तालुक्यांत सिंचन केले जाते. डिंभेतील 12.5 टीएमसी पाणी साठ्या पैकी 6.28 उजव्या कालव्यासाठी, तर 6.22 डाव्या कालव्यासाठी वाटप झालेले आहे. परंतु आतापर्यंत कधीच डाव्या कालव्याखालील शेतकर्‍यांना त्यांचा वाटा मिळाला नाही.

डिंभेमधून येडगाव धरणात येणारा कालवा पूर्ण क्षमतेचा नाही. या उलट पुणे जिल्ह्याच्या हद्दीत कुकडी, घोड व मीना नदीवर 65 बंधारे भरले जातात. आता तर त्यांचा कुकडी प्रकल्पात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डिंभेतून माणिकडोह धरणात पाणी आणण्यासाठी प्रस्तावित बोगदा मंजूर केला असल्याचे समजते. परंतु उपयुक्त पाणी साठ्यातील 50 टक्के संचयावरून खोदण्यासाठी सत्ताधार्‍यांनी विरोध करून ओहरफ्लो लेवलवरुन खोदण्यास परवानगी दिली. म्हणजे डिंबेतील हक्काचे पाणी डाव्या कालव्याखालील शेतकर्‍यांना बोगद्यातूनही द्यायचे नाही आणि डिंबे यडगाव कालवाही मोठा करायचा नाही. मतदारसंघ मजबूतीसाठी इतरांवर अन्याय करायचे धोरण आहे, असा आरोपही त्यांनी केला.

दोन दिवसांपूर्वी बोगदा आणि 65 बंधार्‍यांचा कुकडी प्रकल्पात समावेश करण्याचा चुकीचा निर्णय झाला. त्यास आमचा विरोध आहे. संचय पातळीबाबत घेतलेला निर्णय शेतकर्‍यांना देशोधडीला लावणारा आहे. या निर्णयामुळे आपल्याला कुकडीचे पाणी कधीच मिळणार नाही. या निर्णयाविरोधात आपण शेतकर्‍यांना सोबत घेऊन न्यायालयात धाव घेणार आहोत.

शेतकर्‍यांमध्ये जनजागृती महत्त्वाची

नाहटा म्हणाले, कुकडीच्या पाण्याबाबत दरवर्षी राजकारण तापते. आता डिंभे ते माणिकडोह बोगदा हाच एकमेव पर्याय असून याबाबत आपल्यावर अन्यायकारक निर्णय होत असेल, तर त्याला विरोध करावा लागणार आहे. त्यासाठी शेतकर्‍यांमध्ये जनजागृती महत्त्वाची आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT