अहमदनगर

नगर : अत्याचारानंतर बालिकेचा गळा दाबणारा जेरबंद

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  पाच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून, तिचा गळा दाबून निर्घृणपण खून करण्याचा प्रयत्न करणार्‍या नराधमाने तिचे आई-वडिल आल्याचे पाहून धूम ठोकली. राहुरी तालुक्यात पूर्व परिसरातील एका गावामध्ये मानवतेला काळीमा फासणारा हा अमानुष प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, किशोर ऊर्फ केश्या विजय पवार (25 वर्ष, रा. आरडगाव, ता. राहुरी) असे या नराधमाचे नाव असून, पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या आहेत.

पीडित बालिकेचे आई- वडील 18 जून रोजी दुपारी 12.30 वाजता कामानिमित्त घराबाहेर गेले होते. ही संधी साधून नराधम किशोर पवार तिच्या घरात घुसला. चिमुरडीला उचलून त्याने घरालगत आडोशाला नेले. अत्याचारानंतर या नराधमाने चिमुरडीच्या कपड्याने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने आई-वडिल तिच्या शोधात घटनास्थळी पोहोचले. आई आरडाओरड करीत असताना तिचे वडील जवळ येत असल्याचे पाहून किशोर पवार याने मुलीच्या आईला जोराचा धक्का देत धूम ठोकली.

अत्यंत अमानुष, निंदनीय घटनेत मुलीचा जीव वाचविण्यात तिच्या आई- वडिलांना यश आले. चिमुरडीचा जीव वाचल्यानंतर तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, अ.नगर येथे दाखल करण्यात आले.नराधम किशोर पवारविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यामध्ये अत्याचार व पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दुष्कृत्यानंतर अवघ्या काही वेळेतच पोलिसांनी किशोरच्या मुस्क्या आवळल्याने समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान, घटनेचे गांभीर्य पाहता श्रीरामपूर अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर, पोलिस उपाधिक्षक संदीप मिटके, श्रीरामूपर पोलिस निरीक्षक मच्छिंद्र खाडे, पोलिस उपनिरीक्षक एस.बी. देवरे, पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील, सज्जन नर्‍हेडा यांसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नर्‍हेडा करीत आहे.

पीडितेला न्याय मिळवून देवू : मिटके
गुन्हा दाखल होताच आरोपीला तत्काळ अटक केली आहे. मानवतेला काळीमा फासत समाजामध्ये गैरकृत्य करणार्‍याची कोणतीही तमा करणार नाही. पीडित चिमुकलीस न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करील, अशी माहिती श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.

SCROLL FOR NEXT