अहमदनगर

गोरगरिबांचा घास…बिलाला त्रास, निकृष्ट दर्जाचे अन्न खाण्याची वेळ

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन महिन्यांपासून शिवभोजन केंद्रचालकांची बिले रखडली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 41 केंद्रांतील भोजनाचा दर्जा घसरला आहे.मार्च महिन्यापासून आथिंक परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे गोरगरिब जनतेबरोबरच निराधार व्यक्तींना निकृष्ट दर्जाचे अन्न खाण्याची वेळ आली आहे.

गोरगरिब तसेच निराधार जनतेला एकवेळचे पोटभर जेवण अवघ्या दहा रुपयांत मिळावे, यासाठी महाविकास आघाडी सरकारने 26 जानेवारी 2020 पासून शिवभोजन केंद्रे सुरु केली आहेत.सरकारी नोकरदार वगळता इतर कोणत्याही व्यक्तीला तीन चपाती, भाजी, भात व डाळ अशी थाळी उपलब्ध केली जात आहे.

नगर शहरात प्रारंभी दहा शिवभोजन केंद्रांना परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर केंद्रात वाढ झाली. आजमितीस नगर शहरात 17 केंद्र कार्यान्वित आहेत. दिवसाला जवळपास 2 हजार 100 थाळ्या उपलब्ध केल्या जात आहेत. ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकार्णीं देखील गोरगरिब जनतेसाठी ही सोय उपलब्ध केली आहे. ग्रामीण भागात 24 शिवभोजन केंद्र आहेत. जिल्हाभरात दररोज 4 हजार 800 थाळ्या उपलब्ध केल्या जात आहेत. प्रत्येक दिवशी वेगवेगळी भाजी,डाळ दिली जात आहे. कोणत्या दिवशी कोणती भाजी करावयाची आहे. याचे टाईमटेबल तयार करण्यात आले आहे.

शिवभोजन थाळीपोटी दरमहा या केंद्रचालकांना अनुदान वाटप करण्यात येत आहे. परंतु मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांचे अनुदान अद्यापि केंद्रचालकांना उपलब्ध झाले नाही. अनुदान उपलब्ध झाले नसल्यामुळे केंद्रचालकांची उधारी वाढली आहे. त्यामुळे त्याचा पैसे मागणीसाठी तगादा सुरु झाला आहे. अगोदरची थकबाकी द्या, तरच किराणा सामान घेऊन जा, असे दुकानदार केंद्रचालकांना सुनावत आहेत.

किराणा सामान घेण्यास पैसे उपलब्ध नसल्यामुळे शिवभोजन केंद्रांतील भोजनाचा दर्जा घसरला आहे. त्यामुळे निकृष्ट भोजन खाण्याची वेळ गोरगरिब व निराधार जनतेवर आली आहे.

दरमहा 18 लाखांचा बोजा
जिल्ह्यात सध्या 41 शिवभोजन केंद्र सुरु आहेत. एका थाळीपोटी नगर शहरातील शिवभोजन केंद्रचालकांना 40 रुपये तर ग्रामीण भागातील केंद्रचालकांना 25 रुपये अनुदान दिले जात आहे. त्यामुळे शिवभोजन अनुदानापोटी राज्य शासनाला जिल्ह्यासाठी दरमहा जीएसटी व आयकर कर वगळून 18 लाख 65 हजार 506 रुपये अदा करावे लागत आहे.

कर्मचार्‍यांमुळे होतोय विलंब
शिवभोजन केंद्रचालकांना दरमहा अदा करण्यासाठी पैसे उपलब्ध आहेत. परंतु प्रत्येक तहसील कार्यालय व नगर शहर अन्नधान्य कार्यालयाच्या वतीने प्रत्येक महिन्याचे बिल उपलब्ध होत नाही. त्यामुळे शिवभोजन केंद्रचालकांचे बिले अदा होण्यास विलंब होत असल्याचे पुरवठा विभागातून सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT