नेवासा/भेंडा : विधिवत पूजा करून ज्ञानेश्वर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता करताना चेअरमन माजी आमदार नरेंद्र घुले. समवेत माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी आमदार पांडुरंग अभंग व मान्यवर. 
अहमदनगर

गाळपात ‘ज्ञानेश्वर’ राज्यात तिसरा, कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले पाटील यांनी दिली माहिती

अमृता चौगुले

नेवासा/भेंडा : पुढारी वृत्तसेवा

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने यंदाचा 48 व्या गळीत हंगामात आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढून 16 लाख 61 हजार मेट्रिक टन उसाचे उच्चांकी गाळप केले. ऊस गाळपात सहकारी कारखान्यांमध्ये ज्ञानेश्वर राज्यात तिसर्‍या क्रमांकावर असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी दिली.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 48 व्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे हस्ते ऊस गव्हाणीची विधिवत पूजा करून झाली. यावेळी कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, कारखान्याचे उपाघ्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, तज्ज्ञ संचालक डॉ. क्षितिज घुले पाटील, ज्येष्ठ संचालक अ‍ॅड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सचिव रवींद्र मोटे व्यासपीठावर उपस्थित होते.

पांडुरंग अभंग म्हणाले, कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप केले आहे. हंगाम लांबणीवर गेल्यास आणि उन्हाची तीव्रता वाढल्यास शेतकर्‍यांना ऊस तोडणीसाठी पैसे द्यावे लागतात. त्यासाठी गळीत हंगाम 180 दिवसांचाच असला पाहिजे. पुढील हंगामात प्रतिदिन 10 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याच्या द़ृष्टीने गाळप क्षमतेत वाढ करण्यात येणार आहे. केवळ साखरेवर अवलंबून न राहता प्रतिदिन 45 हजार लिटर क्षमतेची नवीन डिस्टिलरी व प्रतिदिन 50 लिटर क्षमतेचा नवीन इथेनॉल प्रकल्प हाती घेण्यात आला.

कार्यकारी संचालक अनिल शेवाळे म्हणाले, कार्यक्षेत्रात 21 लाख टन ऊस उपलब्ध होता. या हंगामात 16 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट होते. ते पूर्ण करून 220 दिवसांत 16 लाख 61 हजार मेट्रिक टन ऊस गाळप झाले. 13 लाख 78 हजार 500 क्विंटल पांढरी साखर, तर 3 लाख 20 हजार 500 क्विंटल रॉ शुगर उत्पादित केली. देशात उत्पादित होणारी अतिरिक्त साखर उत्पादनाला केंद्र सरकारने दिलेल्या सर्व पर्यायांचा आपण वापर करून साखर निर्यात केली.

बी-हेव्ही मोलासेसपासून इथेनॉल निर्मिती करण्यात येत आहे. संचालक मंडळाचे मार्गदर्शन, शेतकी विभाग, कामगार, अधिकारी, ऊसतोड कामगार, मुकादम, तसेच ऊस उत्पादक शेतकरी अशा सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले.
कारखान्याचे संचालक काशीनाथ नवले, काकासाहेब शिंदे, प्रा. नारायण म्हस्के, गोरक्षनाथ गंडाळ, भाऊसाहेब कांगुणे, जनार्धन कदम, शिवाजी कोलते, मच्छिंद्र म्हस्के, पंडितराव भोसले, बबनराव भुसारी, सखाराम लव्हाळे, दीपक नन्नवरे, लक्ष्मण पावसे, विष्णू जगदाळे, बबनराव भुसारी, अशोकराव मिसाळ, दादासाहेब गंडाळ, संचालिका लताताई मिसाळ, कामगार संचालक सुखदेव फुलारी, नेवासा बाजार समितीचे सभापती डॉ. शिवाजी शिंदे, तुकाराम मिसाळ, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रभाकर कोलते, जनार्दन पटारे, गणेशराव गव्हाणे, अंबादास कळमकर, बबनराव जगदाळे, मिलिंद कुलकर्णी, भय्यासाहेब देशमुख, मोहनराव देशमुख, मोहनराव गायकवाड, घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस, रामभाऊ पाउलबुद्धे, भानुदास कावरे, भाऊसाहेब चौधरी, अशोक वायकर, अंबादास कळमकर, राजू परसैय्य, नामदेव निकम, कारखान्याचे तांत्रिक सल्लागार एम. एस. मुरकुटे आदी उपस्थित होते. भाऊसाहेब सावंत यांनी सूत्रसंचालन केले. संचालक पंडितराव भोसले यांनी आभार मानले.

पुढचा हंगाम 15 ऑक्टोबरला

घुले म्हणाले, सहवीज निर्मिती प्रकल्पातून 11 कोटी 61 लाख 32 हजार 133 युनिट वीजनिर्मिती झाली. त्यापैकी 7 कोटी 4 लाख 51 हजार 320 युनिट वीज महावितरण कंपनीला निर्यात केली. आजअखेर ऑईल कंपन्यांना 80 लाख लिटर इथेनॉलचा पुरवठाही करण्यात आला आहे. पुढील हंगाम 15 ऑक्टोबरला सुरू होईल. त्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT