कोंभळी : पुढारी वृत्तसेवा
एखादा गुन्हा सिद्ध झाल्यावर खडी फोडण्याच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र, कोंभळी फाटा ते कर्जत मार्गावर प्रवास करणार्या प्रवाश्यांनी कोणताही गुन्हा केला नसताना रस्त्यावर टाकलेल्या खडीची शिक्षा त्यांना सहन लागत आहे. तीन वर्षांनंतरही या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसून हा मार्ग प्रवापश्यांसाठी अतिशय खडतर बनला आहे.
माजी मंत्री राम शिंदे यांच्या कार्यकाळात हायब्रीड ऍन्यूटी प्रकल्पांतर्गत कोंभळी फाटा ते कर्जत रस्त्याला 2018 साली मंजुरी देण्यात आली होती. तीन वर्षे उलटूनही रस्त्याचे काम अर्धवट आहे. 24 महिन्यांचा निविदा कालावधीही उलटून गेला आहे. अनेक ठिकाणी या रस्त्याचे काम शेतकर्यांच्या तक्रारी, वनविभागाच्या परवानग्यांमध्ये अडकले आहे. चिंचोली रमजान व कोंभळी येथे शेतकर्यांच्या तक्रारी आल्याने तेथील रस्त्याचे काम बंद आहे. थेरगाव, चांदे, रेहकुरी येथील वनक्षेत्रातून रस्ता जात असल्याने तेथील काम वनविभागाच्या परवानगी अभावी रखडले आहे.
या मार्गावर ठिकठिकाणी खडी टाकण्यात आली होती. पण, ती खडी आता वाहनांच्या वर्दळीने संपूर्ण रस्त्यावर पसरली आहे. परिणामी या मार्गावरून वाहतूक करणार्या वाहनधारकांना पहिले खड्डे चुकवीत वाहने चालवावी लागत. मात्र, आता खडी चुकविण्याची कसरत करावी लागत आहे. त्यात खडीरून घसरून अपघात होण्याचा धोकाही आहे.
अजून किती दिवस या रस्त्यावरील खडीतून वाट काढावी लागणार, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. शेतकर्यांच्या तक्रारी, वनविभागाची परवानगी मिळेपर्यंत खडी पसरलेल्या मार्गावरून वाहनचालकांना वाट कोण दाखवणार, हे येणारा काळच सांगू शकेल.
रस्ता रुंदीकरणाच्या परवानगीसाठी वेळ लागत असल्याने सध्या आहे त्याच रुंदीवर काम करण्यासाठी प्रस्ताव सादर झाला आहे.
एक ते दीड महिन्यांत त्याची परवानगी मिळेल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होणारा त्रास आणि संभाव्य अपघाताच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याची मागणी या भागातील ग्रामस्थ, तसेच वाहनचालकांकडून होत आहे.
वनविभागाच्या परवानगीचे घोडे कुठे अडले?
या रस्त्याच्या कामास सुरुवात होऊन सुमारे तीन वर्षे उलटून गेली आहेत. तरीही या रस्त्याच्या कामासाठी लागणार्या विविध परवानग्या मिळालेल्या नाहीत. रस्त्याचे काम वनविभागाच्या हद्दीत अडकून पडले आहे. वनविभागाच्या परवानगीचे घोडे नेमके कुठे अडले, हे कळायला मार्ग नाही.
वनविभागाच्या हद्दीत रखडलेल्या कामाचे सध्याच्या रुंदीवरच काम पूर्ण करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. एक ते दीड महिन्यात वनविभागाची परवानगी मिळेल. ज्या ठिकाणी अडचणी नाहीत, तेथील काम सुरू आहे.
– अमित निमकर
उपअभियंता, सा. बां. विभाग.