अहमदनगर

…अन् वर्‍हाडाची पळता भुई थोडी झाली..!

अमृता चौगुले

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा: सध्या जिकडे तिकडे लग्नांचा जोरदार धुमधडाका सुरू आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी फाट्यावर असाच एक लग्न समारंभ आयोजित करण्यात आला होता. सगळं कसं वेळेत पार पडत असतानाच सौभाग्यवती कांक्षिणी ही अल्पवयीन असून हे लग्न रोखण्यासाठी पोलिस आता मंगल कार्यालयात येणार आहेत, असे समजताच वर्‍हाडी मंडळींची एकच धावपळ उडाली. वर-वधूकडील दोन्ही पाहुणे मंडळींनी मंगल कार्यालय सोडून घर गाठणे पसंत केले आणि काही मिनिटांतच सनई-चौघड्यांच्या सुरांनी भरलेले मंगल कार्यालय रिकामे झाले.

अधिक माहिती अशी की, देवदैठण परिसरातील एका सतरा वर्षीय मुलीचा विवाह त्याच भागातील एका तरुणाशी ठरला होता. लग्नाची तारीख निश्चित झाली. मंगल कार्यालय ठरले. ठरल्याप्रमाणे मंगल कार्यालयात साखरपुडा, हळदी समारंभही झाला. लग्नाची दोन्ही बाजूकडून तयारी सुरू झाली. वधू-वरांचे 'मेकअप' सुरू होते. परण्या काढण्यासाठी वाजंत्री सज्ज होती. उपस्थितांची छबी टिपण्यासाठी लगबग फोटोग्राफरची सुरू होती.

वर आणि वधूच्या जवळचे नातेवाईक सजून तयार होते. तेवढ्यात कोणीतरी बेलवंडी पोलिस ठाण्यात या बाल विवाहाबाबत माहिती दिली. बेलवंडी पोलिसांनी लागलीच मंगल कार्यालयाकडे धाव घेतली. पोलिस येणार असल्याची चर्चा मंगल कार्यालयात सुरू होता. पोलिस येणार असल्याने नातेवाईकांची पळापळ सुरू झाली. जो-तो आपल्या पद्धतीने तेथून निसटण्याचा प्रयत्न करू लागला. वधू आणि वराला तातडीने तेथून अन्य ठिकाणी हलविण्यात आले. पाहुणे मंडळी लगोलग गायब झाली. पोलिस मंगल कार्यालयात पोहचले तेव्हा मंगल कार्यालयात कोणीच हजर नव्हते. सनई-चौघड्याच्या आवाजात भारून गेलेले मंगल कार्यालय काही मिनिटांत शांत झाले. पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली. मात्र लग्न नेमके कोणाचे होते, याची माहिती मिळू शकली नाही.

पोलिस गेले तेव्हा कोणीच नव्हते!
देवदैठण भागाचे बीट अंमलदार तथा सहाय्यक फौजदार मारुती कोळपे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर बेलवंडी पोलिस तेथे गेले होते. मात्र पोलिस येणार असल्याची माहिती आधीच समजल्याने मंगल कार्यालयातील सगळे लोक पळून गेले होते. वर्‍हाडी मंडळींना केलेला स्वयंपाक मात्र तसाच होता.

जनजागृती, कायदे असूनही बालविवाह कसे?
बालविवाह करू नयेत, यासाठी सर्वत्र वेगवेगळ्या पातळ्यांवरून प्रबोधन, जनजागृती केली जात आहे. बालविवाह होणार नाही, यासाठी नवीन कायदे अस्तित्वात आणले. मात्र तरीही बालविवाह थांबायला तयार नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT