अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : 'साहेब, एका फाईलसाठी वारंवार येथे चकरा मारतोय, नगरला यायचे झाले तर दर वेळी 100 किलोमीटरवरून यावे लागते. पण अर्थ व पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी दर वेळी वेगवेेगळी कारणे देऊन मागे पाठवितात. आजही पुन्हा मोठ्या आशेने आलो; पण पुन्हा मागे जावे लागणार. आता तुम्हीच मला मदत करा..' अशी हात जोडून विनंती करताना 'त्या' व्यक्तीचा अश्रूंचा बांध फुटला. दरम्यान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी याबाबत गंभीर दखल घेऊन संबंधित कर्मचार्यास जाब विचारला आणि तत्काळ 'ती' फाईल मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या.
त्यामुळे 'त्या' व्यक्तीच्या चेहर्यावरही हास्य फुलले. एकीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर 'नो पेन्डन्सी'बाबत सक्त सूचना करतात, तर दुसरीकडे कर्मचारीच फायली दाबून ठेवत असल्याचा प्रकार नुकताच समोर आला. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की चिंचोली गुरव येथील संबंधित व्यक्ती कंत्राटी कर्मचारी म्हणून संगमनेर तालुक्यात काम करत आहे. 15 व्या वित्त आयोगातील पाणीपुरवठ्याच्या कामाची एक फाईल झेडपीत पेंडिंग आहे. वरिष्ठांनी कार्यारंभ आदेश घेण्यासाठी त्यांना झेडपीत पाठविले.
मात्र अनेक चकरा मारूनही एका कर्मचार्यांनी त्यांना वेळोवेळी मागे पाठविले. एकदा नगरला यायचे म्हटले तरी 100 किलोमीटर यावे लागते. मात्र अशी अडवणूक होत असल्याने आणि अशा अनेक चकरा मारून थकल्याने 'त्या' व्यक्तीने अखेर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लांगोरे यांच्याकडे धाव घेतली. यावेळी दोन कर्मचार्यांकडून कशी पिळवणूक केली जाते, हे सांगताना 'त्याचे' डोळे पाणावले. लांगोरे यांनी संबंधिताला बसण्यास सांगितले, पाणी दिले. त्याचे म्हणणे ऐकून घेत तत्काळ संबंधित कर्मचार्यांना बोलावून जाब विचारला.
'काही अडचण असेल तर ठीक; पण काही अडचण नसताना फायली पुढे का जात नाहीत़? अशाप्रकारे अडवणूक का केली जाते?' असे प्रश्न केले. तसेच एका तासाच्या आत संबंधित व्यक्तीचे काम मार्गी लावा, अशी सूचना केली. वरिष्ठ अधिकार्यांनी आपली दखल घेतल्याचे पाहून त्याच्या चेहर्यावर समाधान झळकल्याचे दिसले.
हेही वाचा