अहमदनगर

महिला दिनविशेष : वेळेत ‘ही’ काळजी घेतल्यास कॅन्सरवर मात : डॉ. सोनवणे

Laxman Dhenge

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : कॅन्सर या आजाराची लागण ही एका दिवसात होत नसून त्याला अनेक वर्षांचा कालावधी शरीरात पसरण्यासाठी लागतो. यावर वेळेत निदान करून उपचार घेतल्यास कॅन्सर पूर्णतः बरा होतो, असे प्रतिपादन कॅन्सर सर्जन डॉ. सतीश सोनवणे यांनी केले. सुवर्णयुग तरुण मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष व जागतिक महिला दिनानिमित्त 'कॅन्सर' विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा खेडकर, डॉ. अभय भंडारी, उज्ज्वला शेवाळे, शीतल लोहिया, डॉ. सोनाली भंडारी, आशा जोजारे, मेघा महालकर, संगीता पांडव, ज्योती खांदाट आदी उपस्थित होते.

डॉ. खेडकर, माधुरी जोशी, योगिता क्षीरसागर या कर्तृत्वत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला. सोनवणे म्हणाले की, आरोग्याविषयी प्रत्येक घराघरात आता चर्चा होत असून, कुटुंबाचा आजारांपासून बचाव करण्यामध्ये स्त्रियांचा मोठा वाटा आहे. कॅन्सर हा आजार कोणालाही होऊ शकतो; पण मात्र त्याचे निदान झाल्यावर त्या दिवसापासून प्रभावी उपचार झाल्यास त्याच्यावर आपण विजय मिळवू शकतो. कॅन्सर आजाराविषयी जनजागृती प्रचंड प्रमाणात वाढली असून, छोट्या छोट्या गोष्टींच्या काळजीने कॅन्सरच्या आजाराचे प्रमाण कमी होऊन बरा होत आहे, असेही डॉ. सोनवणे म्हणाले. प्रास्ताविक शीतल लोहिया यांनी, तर सूत्रसंचालन डॉ. अमृता वेलदे यांनी केले. आभार माया भंडारी यांनी मानले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT