अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : माहेरी गेलेल्या महिलेवर पेट्रोल ओतत पेटवून ठार मारल्याप्रकरणी दोन आरोपींना न्यायालयाने जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.आर.सित्रे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. सरकारी पक्षातर्फे अॅड.वैशाली राऊत यांनी न्यायालयात बाजू मांडली.
अविनाश ऊर्फ आवड्या सादीश काळे व सादीश जाकीट काळे (दोघे रा. वाळुंज पारगाव, ता. पारनेर) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी करिश्मा रितेश भोसलेवर पेट्रोल ओतून 18 सप्टेंबर 2018 रोजी ठार मारले होते. मयत महिला ही निघोजला (ता. पारनेर) आई-वडिलांना भेटण्यासाठी गेली होती.
आरोपींनी तिला 'आमच्या पालावर का आली' असे म्हणत अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. तसेच, आरोपींनी पुरावा नष्ट केला होता. उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आरोपींविरूद्ध पारेनर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सरकार पक्षाच्या वतीने 11 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पैरवी अधिकारी एएसआय एकनाथ जाधव व हवालदार शिवनाथ बडे यांनी सहाकार्य केले.
हेही वाचा