अहमदनगर

नगर : आ. लहामटे शरद पवारांसोबत ; मुंबईतील बैठकीला उपस्थित राहून दर्शविला पाठिंबा

अमृता चौगुले

अकोले : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार व अजित पवार असे दोन गट पडल्यााच्या पार्श्वभूमीवर अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी बुधवारी थेट 'सिल्व्हर ओक' गाठून शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्या सोहळ्यात आमदार डॉ. लहामटे पहिल्या रांगेत बसले होते. त्यामुळे ते अजित पवारांसोबत असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

पण नंतर 'मला वाटले साहेबांची मान्यता आहे, म्हणून मी सही केली' असे म्हणत त्यांनी 'देवगिरी'वरील सर्व घडामोडींची माहिती पत्रकारांना दिली. अकोल्यातील जनता जो निर्णय देईल त्यानुसार भूमिका घेणार असल्याचेही त्यांनी मंगळवारी (दि. 4) जाहीर केले. दरम्यान, जनतेचा कौल मिळाल्याचे सांगत डॉ. लहामटे यांनी बुधवारी शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. नंतर मुंबईतच यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या बैठकीतही सहभागी होत शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेत त्यांच्यासोबत असल्याचा निर्णय जाहीर केला.

शरद पवार आमचे गुरू :  डॉ. लहामटे
आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्त केलेल्या भावना अशा ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे राजकारणातील गुरू असून आदरस्थानी आहेत. अजित पवार व शरद पवार वेगवेगळे होणे आम्हाला अपेक्षितच नसून, खूप दुःख झाले आहे. शरद पवारांनी किती आमदार कोणासोबत गेले त्याची चिंता कधी केली नाही आणि करणारही नाहीत. तसेच राष्ट्रवादी पक्षसंघटन उभे करणे, जनतेत जाणे या विषयावर आमची चर्चा झाली. शरद पवार यांना किती वेळा आमदार सोडून गेले तरी त्यांनी उभारी घेऊन राष्ट्रवादी पक्ष उभा केला.

भांगरे, आवारी, तिकांडे, हांडे, गडाख, भोर, मालुंजकर आणि रोकडेही सोबत
जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य व अगस्ती साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष सुनीता भांगरे यांनीही या वेळी उपस्थित राहून शरद पवार यांना पाठिंबा दिला. भांगरे यांनी सोमवारी कराड येथेच शरद पवार यांची भेट घेऊन पाठिंबा दिला होता. मुंबई येथील बुधवारच्या बैठकीतही त्या उपस्थित होत्या. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे सरचिटणीस विनोद हांडे, विकास बंगाळ, ज्येष्ठ नेते सुरेश गडाख हेही त्यांच्यासमवेत होते. राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष नीता आवारी, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष स्वाती शेणकर, ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्ष उज्ज्वला राऊत, सेक्रेटरी सुजाता भोर, महिला कार्याध्यक्ष सीमा मालुंजकर, शहराध्यक्ष भीमा रोकडे यांनीही शरद पवारांनाच पाठिंबा दिला आहे.

गायकर, वाकचौरे अजित पवारांच्या पाठीशी
अकोल्यातील अजित पवारांचे कट्टर समर्थक असलेले अगस्ती साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक सीताराम पाटील गायकर, संचालक कैलास वाकचौरे, माजी संचालक प्रकाश मालुंजकर, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष बबन वाळुंज, अकोले खविसंचे अध्यक्ष प्रकाश नाईकवाडी आदींनी बुधवारी मुंबईतील बैठकीला हजेरी लावून अजित पवार यांना पाठिंबा दिला. आम्ही अजित पवार यांच्यासोबतच आहोत, असे गायकर यांनी दैनिक पुढारीला सांगितले.

हे ही वाचा : 

SCROLL FOR NEXT