अहमदनगर

चार्‍याचं ठीक, पण..पाण्याचं काय? रणरणत्या उन्हात मेंढपाळांची भटकंती

अमृता चौगुले

ज्ञानदेव गोरे

वाळकी(अहमदनगर) : पावसाळ्याचे चार महिने सोडले तर शेळ्यामेंढ्याचे पोट भरण्यासाठी आठ महिने भटकंती करावी लागते. माणसाचे पोट कसेही भरेल; मात्र जीवापाड सांभाळलेल्या शेळ्यामेंढ्याचे पोट कसे भरायचे याची चिंता आम्हाला दिवाळीपासून लागते. चारा अन् पाण्याच्या शोधार्थ शेकडो मैलांची भटकंती करावी लागते. चार्‍याच कसं तरी भागत हो, पण पाण्याचे काय? असा प्रश्न उभा राहतो. रणरणत्या उन्हात पाण्याचा शोध घेताना नाकी नऊ येते. पाण्यासाठी जीव कासावीस होत असल्याची खंत मेंढपाळाने व्यक्त केली.

मेंढपाळांची संख्या मोठी आहे. एका मेंढपाळाकडे जवळपास 200 ते 300 शेळ्या-मेंढ्या असल्याने एकाच ठिकाणी किती दिवस चारा पुरणार. यासाठी तीन-चार मेंढपाळ एकत्रित चारा, पाण्याच्या शोधार्थ बाहेर पडले आहेत. शाळेत शिकणारी मुलंबाळे आजी आजोबा किंवा भावांकडे सोडून पत्नी व चिमुकले सोबतील चारपाच घोडे, दहा-वीस कोंबड्या अन् शेळ्यामेंढ्यांच्या राखणीला असलेले कुत्री, असा कबिला चारा, पाण्याच्या शोधार्थ पायपीट करत आहे.

उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्याने शेळ्यामेंढ्या सांभाळूनच संसाराचा गाडा चालवावा लागतो. चारा, पाण्यासाठी पावसाळ्याचे दिवस सोडता आठ महिने भटकंती करावी लागते. हिवाळ्यात चारापाण्याची टंचाई जाणवत नाही. पण उन्ह्याळ्यात नदी, नाले कोरडे पडल्याने पाण्यासाठी भटकावी लागते. पाण्यासाठी जनावरांची होणारी कासावीस डोळ्याने पाहवत नाही, जीव तुटतो हो.

– आण्णा टेंगले,
मेंढपाळ, बारामती

आमच्या अडीअडचणी सरकार दरबारी मांडणे महत्वाचे असताना असे घडताना दिसत नाही. निवडणुकी पुरते फक्त आश्वासनाचे गाजर दाखविले जाते. आमच्या समस्या, अडचणी खूप आहेत. सरकारने एखादी योजना सुरू करून आमचा विकास करावा.

– खंडू टेंगले,
मेंढपाळ, बारामती

हेही वाचा

SCROLL FOR NEXT