अहमदनगर

अहमदनगर : इमामपूरमध्ये पाण्यासाठी पावसाळ्यात भटकंती

अमृता चौगुले

अहमदनगर तालुका; पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील इमामपूर गावामध्ये ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. गावात पाणीटंचाई जाणवत असून तात्काळ टँकर सुरू करण्याची मागणी सरपंच भीमराज मोकाटे यांनी केली आहे. इमामपूर गाव हे डोंगर उतारावर वसलेले गाव आहे. भौगोलिक रचनेनुसार येथे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भुजल पातळीत वाढ होऊन पाण्याची समस्या मिटत असते. परंतु चालू वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे.

परिसरातील सर्व विहिरी, तलाव, बंधारे, बोअरवेल कोरडे ठाक पडले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती सुरू आहे. पशुधन जगवणे अवघड झाले आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच गावातील वस्त्यांवर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत होते. सद्यस्थितीत पाणीच शिल्लक नसल्याने नागरिक तसेच जनावरांचे हाल होत आहेत. प्रशासनाकडे टँकर साठी प्रस्ताव पाठविण्यात आला असून तात्काळ टँकर सुरू करण्याची मागणी सरपंच भीमराज मोकाटे यांनी केली आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT