करंजी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी व नगर तालुक्यांतील बारा गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्या वांबोरी चारी टप्पा दोनच्या सर्व तांत्रिक अडचणी दूर करीत या योजनेला प्रशासकीय मंजुरी देत निविदा काढण्याचाही मार्ग आता मोकळा झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच या योजनेच्या कामाचे भूमिपूजन करणार असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी दिली.
जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांनी वांबोरी चारी टप्पा दोनचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून सर्व तांत्रिक अडथळे तत्काळ दूर केले. त्यामुळे आता या योजनेचा मार्ग सुकर झाला असून, पाथर्डी व नगर तालुक्यांतील डोंगरपट्ट्यातील गावच्या शेतकर्यांचे सिंचन क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री बाळासाहेब विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी खर्या अर्थाने वांबोरी चारी योजनेला दिशा दिली. त्यानंतर आपणही वांबोरी चारी टप्पा दोनच्या कामाचा सातत्याने प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला.
उदरमल, आव्हाडवाडी, कोल्हार, डमाळवाडी, गितेवाडी, डोंगरवाडी, धारवाडी, लोहसर, पवळवाडी, वैजूबाभळगाव, दगडवाडी, भोसे आणि करंजी या गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
जी गावे या योजनेत समाविष्ट करण्याची राहिली आहेत. त्यांनाही या योजनेत सामावून घेण्यासाठी प्राधान्याने पाठपुरावा केला जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही, याची निश्चितपणे दक्षता घेतली जाईल, असा विश्वास माजी मंत्री कर्डिले यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा