नगर : पुढारी वृत्तसेवा
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात नव्याने 1 लाख 35 हजार 436 नवमतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मार्च 2022 अखेरच्या आकडेवारीनुसार नवीन मतदारांमध्ये युवक 64 हजार 297, तर युवती 71 हजार 139 आहेत. हा वाढलेला टक्का आगामी निवडणुकांमध्ये निर्णायक ठरणारा असणार आहे.
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान प्रक्रियेला विशेष महत्व आहे. त्यामुळेच 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी राज्य निवडणूक विभागाकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. युवकांमध्ये जनजागृती केली जात आहे, शाळा, महा-विद्यालयात शिबीरे सुरू आहेत. त्यातून मतदार यादीतील युवकांची संख्या लक्षणीय वाढताना दिसत आहे.
2019 ला 34 लाख मतदार…
जिल्ह्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी 12 विधानसभा मतदार संघात 33 लाख 93 हजार 87 मतदार संख्या होती. यामध्ये पुरुष 17 लाख 71 हजार 281, तर महिला मतदारांची संख्या ही 16 लाख 21 हजार 671 इतकी असल्याचे समोर आले होते.
सध्या 35 लाखांचा आकडा
विधानसभा निवडणुकीनंतर दोन वर्षांत मतदार नोंदणीचे कार्यक्रम हाती घेण्यात आले होते. यामध्ये मतदारांचा आकडा वाढताना तो 35 लाख 28 हजार 542 इथपर्यंत पोहोचला आहे. तो आणखी वाढत जाणार आहे. यात, पुरुष मतदार 18 लाख 35 हजार, तर महिला 16 लाख 92 हजार 810 आहेत. दरम्यान, हे नवीन मतदार आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आपला पहिला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. त्यामुळे ते या निवडणुकीसाठी उत्सुक आहेत.
नवमतदारांत महिलांचा टक्का वाढला
दोन वर्षांच्या कालावधीत 64 हजार 297 इतकी युवक मतदारांची नवीन नोंदणी झालेले आहे, तर 71 हजार 139 इतक्या महिलांची नवीन मतदार म्हणून नोंद झालेली आहे. त्यामुळे नव्या मतदानात पुरुषांच्या तुलनेत 6842 मतदान हे महिलांचे वाढल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.
पुरुष मतदार
18,35,578
महिला मतदार
16,92,810
पुरुष मतदार
17,71,281
महिला मतदार
16,21,671
64297 युवक मतदार
71139 युवती मतदार
हे ही वाचा :