अहमदनगर

बोधेगाव : ग्रामस्थांनी तीन तास रोखला राज्यमार्ग

अमृता चौगुले

बोधेगाव (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  शेवगाव तालुक्यातील गायकवाड जळगाव येथील कांबीकडे जाणार्‍या सुकळी ते म्हसोबावस्ती या साडेतीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी ग्रामस्थांनी गुरूवारी (दि.10) सकाळी शेवगाव-गेवराई राज्य मार्गावर सुकळी फाटा येथे तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. शेवगावचे नायब तहसीलदार गुरव यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा केली. तसेच या रस्त्याच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्यासंबधी शुक्रवारी (दि.11) गायकवाड जळगाव येथील सरपंच, उपसरपंच, गावचे काही प्रतिनिधी, ग्रामविकास यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस प्रशासन आदींच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासकीय पातळीवर शेवगाव तहसील कार्यालयात बैठक घेऊन व चर्चा केली जाईल.

योग्य तो तोडगा काढला जाईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर तब्बल तीन तास चाललेले रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. तीन तास चाललेल्या रस्ता रोको आंदोलनामुळे सुकळी फाट्यावरील शेवगाव-गेवराई महामार्गावर दोन ते तीन किलोमीटर अंतरावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाचा प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

म्हसोबा वस्तीवर 80 ते 90 कुटुंब राहत असून, याठिकाणी पक्का रस्ता नाही. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी गैरसोय होत आहे. ग्रामस्थ, महिला, वयोवृद्ध व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणच्या अनेक महिलांच्या प्रसूती दवाखान्यात नेताना रस्त्यावरच झाल्या आहेत. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

या आंदोलनात सरपंच आजिनाथ सुरवसे, संदीप घुगे, नवनाथ केसभट, विष्णू केसभट, अशोक सोलाट, सोन्याबापू जाधव, गणेश केसभट, अंकुश भुकेले, रमेश सुरवसे, गोपाल केसभट, संजय शिंदे, संपत केसभट, जनार्धन केसभट, रामदास केसभट, अंबादास महाराज केसभट, शिवबा संघटनेचे हरिभाऊ केसभट, सरपंच लहूराव भवर, भारत घोरपडे, अर्जुन लवंगे, विकास केसभट, सुरेंद्र केसभट, भास्कर सोलाट, अर्जुन जाधव आदींनी सहभागी होत आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थी, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी संतोष पवार, पोलिस गुप्तवार्ता विभागाचे बाबासाहेब गरड, पंचायत समितीचे शाखा अभियंता रावसाहेब साळवे, ग्रामसेवक रामेश्वर जाधव, तलाठी राजेश राठोड, मंडळाधिकारी शशिकांत गोरे, तलाठी सोमनाथ आमने उपस्थित होते. पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, बोधेगाव पोलिस दूरक्षेत्राचे कॉन्स्टेबल दिलीप राठोड, संदीप मस्के आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार
या रस्त्याचे काम लवकरात लवकर न झाल्यास आगामी काळात होणार्‍या सर्व निवडणुकांत ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकतील. कुठल्याही पक्षाच्या पुढार्‍यांना गावात येऊ देणार नाही, अशा संतप्त भावना ग्रामस्थ, महिलांनी आंदोलनादरम्यान व्यक्त केल्या.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT