अहमदनगर

चिचोंडी पाटील : दहा लाखांच्या वस्तूंचा लागेना ताळमेळ; जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रकार

अमृता चौगुले

चिचोंडी पाटील(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळावे. तसेच, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय व्यवस्थापन समितीने लोकसहभागातून साधारण आठ ते दहा लाख रूपये किमतीच्या वस्तू दिल्या. मात्र, या वस्तू आजमितीला गायब आहेत. शाळा व्यवस्थापन समितीने याबाबत आपला काहीही संबंध नसून, ही सर्व खरेदी जुन्या व्यवस्थापन समितीच्या कार्यकाळात झाल्याचे पत्र शिक्षणाधिकार्‍यांना पाठवून या जबाबदारीतून हात झटकले आहेत.

त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे यांच्या हस्ते व जिल्हा परिषदचे माजी सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, तत्कालीन प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी नायर, शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे तसेच स्थानिक पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत चिचोंडी पाटील ग्रामस्थांनी लोकसहभागातून जि. प. शाळेला 8 ते 10 लाख रुपयांच्या वस्तू दिल्या होत्या. मात्र, या वस्तूंची नोंद आणि पंचायत समितीमध्ये असलेली वस्तूंची नोंद एकमेकांशी जुळत नसल्याबाबतची तक्रार ग्रामस्थांनी केली होती.

ही शाळा एक डिजिटल मॉडेल म्हणून जिल्ह्यात ओळखली जात होती. परंतु, सध्या या शाळेत लोकसहभागातील बर्‍याच वस्तू नसल्याचे आढळून येत आहे. लोकसभागातील वस्तूंचा ताळमेळ बसत नसल्याने पूर्वी दिलेल्या वस्तूच अजून ठीक नाहीत आणि आता लोकसहभाग द्यायचा कसा? असा प्रश्न लोकांसमोर उभा आहे. त्यामुळे याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. यावर येथील शालेय व्यवस्थापन समितीने ही सर्व साधने जुन्या शालेय व्यवस्थापन समितीच्या कार्यकाळात खरेदी झाली होती. त्यामुळे नवीन समितीचा याबाबत काहीच संबंध नसल्याचे पत्र शिक्षणधिकार्‍यांना पाठवीत या जबाबदारीतून हात झटकले आहेत.

मग शालेय व्यवस्थापन समितीची जबाबदारी काय आहे, असा सवाल नागरिक विचारत आहेत. याबाबत शिक्षणाधिकार्‍यांकडे दोन महिन्यांपूर्वीच तक्रार केलेली असून, संबंधित तक्रारीवर कुठल्याही प्रकारची चौकशी झालेली नाही. शिक्षणाधिकार्‍यांनी तक्रारीची तत्काळ दखल घेऊन, या साहित्याचा घोळ मिटवावा. अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT