संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: संगमनेर शहरातील माळीवाड्यातील दुकानामध्ये आलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या मनीमंगळसूत्र श्रीरामपूर येथून आलेल्या दोघा सोनसाखळी चोरांनी चोरून पोबारा केला. मात्र, महिलेने आरडाओरडा केला असता पुढच्या चौकात असणारे तरुण सावध झाले आणि त्या दोघांनाही पकडले. जमावाने त्या दोघा चोरट्यांना येथेच्छ चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर शहरातील माळीवाड्यात सुभाष जनार्दन अभंग यांच्या मालकीचे गायत्री मेडिकल दुकान आहे. अभंग हे कामानिमित्ताने बाहेर गेले असता त्यांच्या पत्नी मेडिकलमध्ये एकट्याच असल्याची संधी साधत मंगळवारी सायंकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पल्सर मोटारसायकलवरुन आलेले दोन जण अभंग यांच्या दुकानासमोर येऊन थांबले. दोघांपैकी एक जण खाली उतरला आणि मेडिकलच्या दुकानात गोळी घेण्याच्या बाहण्याने घुसला. त्यानंतर दुकानामध्ये असणाऱ्या महिलेच्या गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची पोत त्याने ओरबाडली. त्याचवेळी ती महिला चोरचोर असे म्हणत जोरजोराने ओरडू लागली. हा आवाज शंभर मीटरवर असणाऱ्या नेहरू उद्यानाजवळ गप्पा मारत बसलेल्या तरुणांनी ऐकला.
महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबडून ते दोघे चोरटे पळून जात असताना नेहरू उद्यानाजवळ असलेल्या तरुणांनी पोलीस ठाण्याच्या दिशेने येणारी पल्सर मोटरसायकल आडवली. पकडलेले ते दोघेही सोनसाखळी चोर असल्याचे समजताच उपस्थित तरुणांनी त्या चोरट्यांना चांगलाच चोप दिला. ही वार्ता पोलिसांना समजताच पोलीसही घटनास्थळी आले आणि तरुणांच्या तावडीतून त्या दोन चोरट्यांची सुटका करत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नेले.
याबाबत संगमनेर शहर पोलिसात सुभाष जनार्दन अभंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दर्शन सोमनाथ सोनसळे (वय 32, राहणार वॉर्ड नंबर दोन सावता रोड श्रीरामपूर) आणि लखन विजय माळवे (वय 32,रा वार्ड नं ७ लबडे वस्ती, श्रीरामपूर) या दोघां चोरट्यांवरती जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार हे करत आहे
हेही वाचा: