नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शनिची साडेसाती घालविण्यासाठी येणार्या भाविकांना दर्शनापूर्वीच लटकुंच्या साडेसातीला सामोरे जावे लागले. शनिभक्तांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला. यामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर होता. ही वाहतूक कोंडी शनिशिंगणापूर येथील पोलिस ठाण्यासमोर झाली होती. राज्यासह परराज्यातून येणार्या भाविकांच्या वाहनांचा दलाल 15 ते 20 किमीपासून पाठलाग करून पूजा साहित्य व वाहन पार्किंगच्या नावाखाली गाड्या अडविण्याचा प्रकार येथील पोलिस ठाण्यासमोर होताना दिसतो. लटकू दलालांच्या कारनाम्यापुढे पोलिस गप्प का?, असा सवालही भाविकांमधून विचारला जात आहे.
शनिची साडेसाती मिटविण्यासाठी राज्यासह परराज्यातून दिवसाला हजारो भाविक शनिशिंगणापूरात येतात. यामुळे भाविकांच्या जीवावर पोट भरणारी मंडळी वेगवेगळ्या कारनाम्याखाली भाविकांची लूट करताना दिसून येतात. शनिची साडेसाती मिटविण्यापूर्वीच दलालांच्या साडेसातीला भाविकांना सामोरे जावे लागते. असे दुर्देवी चित्र नेहमी येथे पहावयास मिळते.
भाविकांच्या एका गाडीमागे चार ते पाच मोटरसायकलवरून सुसाट वेगाने भाविकांना सोयीसुविधेचा बहाणा करून अडविण्याचा प्रकार केला जातो. भाविकांनी गाडी थांबविली नाही तर भाविकांना दमदाटीही करण्याच्या घटना घडताना दिसतात. भाविकांची वाहने चक्क पोलिस ठाण्यासमोरच अडविण्यात येत असून, पोलिस एक शब्दही लटकूंना उच्चारत नसल्यामुळे लटकूंची दादागिरी वाढली आहे. पोलिसांची बघ्याच्या भूमिकेमुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
गर्दीचा फायदा घेण्यासाठी पूजा साहित्य विक्रेत्यांनी रस्त्यावर तीनशेहून अधिक लटकू कार्यरत आहेत. दोनशेहून अधिक मोटारसायकलवर लटकू वाहनांची सक्तीने अडवणूक करतात. वाढत्या तक्रारी होऊनही संबंधित अधिकारी व पोलिसांनी एकही कारवाई केली नाही
शेवटच्या श्रावणी शनिवारनिमित्त शनिशिंगणापूर पोलिसांकडून कुठलेच नियोजन करण्यात आले नसल्याचे दिसून आले. शनिवारी दिवसभर जिल्हा परिषद शाळे समोर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. सायंकाळच्या आरतीनंतर चाळीसहून अधिक मोठ्या खासगी बस रस्त्यावर लावण्यात आल्याने एक तास वाहतूक कोंडी झाली.
हेही वाचा