अहमदनगर

‘तो’ पराभव विखेंमुळे नव्हेच ! : रामदास आठवले ; शिर्डी लोकसभेसाठी मी पुन्हा इच्छुक

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शिर्डी लोकसभा मतदारसंघात 2009 मध्ये झालेला माझा पराभव बाळासाहेब विखे यांच्यामुळे नव्हे, तर केवळ मतदारांच्या गैरसमजुतीतून झाला होता. आज विखे कुटुंबाशी माझे चांगले संबंध आहेत आणि मतदारांचे गैरसमजही दूर झालेे आहेत. त्यामुळे 2024साठी मोदी-शहांनी सांगितले, तर मी शिर्डी लोकसभेसाठी पुन्हा उत्सुक आहे, अशा शब्दात केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली इच्छा बोलून दाखविली. नगर येथे मंगळवारी पत्रकारांनी बोलताना मंत्री आठवले म्हणाले, दलित पँथरची पुनर्बांधणी करण्याचा विचार सुरू आहे. आरपीआय हा राजकीय पक्ष असेलच; पण पँथरच्या माध्यमातून अन्याय, अत्याचाराच्या विरोधात काम केले जाईल.

भुजबळांना ऑफर
राष्ट्रवादीच्या ओबीसींवर अन्याय सुरू असल्याचे त्यांचेच लोक सांगत आहेत. त्यामुळे छगन भुजबळ यांनी 'आरपीआय'मध्ये यावे, आम्ही त्यांचे स्वागत करू, अशी ऑफर आठवले यांनी या वेळी दिली.

म्हणून पंकजा मंत्रिमंडळात नाहीत!
पंकजा मुंडे यांना केसीआर यांनी मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याबाबत विचारले असता आठवले म्हणाले, की पंकजा मुंडे नाराज नाहीत. त्या भाजपमध्येच राहतील, असा विश्वास आहे. त्या आमदार नसल्याने त्यांना मंत्रिमंडळात स्थान देता आले नाही.

पवारांनी त्यांच्या नादी लागू नये
शरद पवार चांगले राजकारणी, विचारवंत आहेत. त्यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी, नितीशकुमार यांच्या नादी लागू नये. मोदी चांगले काम करत असताना त्यांनी त्यांची स्तुती करणे आवश्यक आहे. मात्र इतरांचे ऐकून ते टीका करतात, असे आठवले म्हणाले. पवार 40 आमदार फोडून मुख्यमंत्री झाले, ती त्यांची खेळी मुत्सद्देगिरीची होती, त्यात बीजेपीचे मंत्रीही होते, असेही ते म्हणाले.

आंबेडकरांचे कृत्य आवडले नाही
भाजप हा मुस्लिमविरोधी पक्ष नाही. माझ्या पक्षाने तर नेहमीच मुस्लिमांना पाठिंबा दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट देणे हे दलित समाजाला आवडले नाही. मुस्लिम तरुणांनी जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. औरंगजेबाचा उदोउदो नको, जातीय सलोखा ठेवा, असे आवाहनही आठवले यांनी केले.

'केसीआर'चा परिणाम नाही
केसीआर यांच्या पक्षाचा कोणताही परिणाम होणार नाही. पाटण्यात विरोधी पक्ष कितीही एकत्र आले तरी नरेंद्र मोदींची प्रतीमा साफ आहे. जनता आमच्यासोबत आहे. त्यामुळे 2024 ला पुन्हा मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मी मुख्यमंत्री होईन तेव्हा..
'भावी मुख्यमंत्री' या बॅनरबाजीवर बोलताना आठवले म्हणाले, की मी मुख्यमंत्री होईन तेव्हाच बॅनर लावीन. माझे 30-40 आमदार निवडून येत नाहीत, तोपर्यंत ही संधी नाही. संधी मिळालीच तर महाराष्ट्रात चांगले काम करीन. मात्र तसे बॅनर अगोदर लावणार नाही.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT