अहमदनगर

पाथर्डी तालुका : दोन मुलींना पळवणार्‍या तिघांना अटक

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पाथर्डीतील दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन त्यापैकी एकीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून संदीप ऊर्फ गणेश चंद्रकांत कापडिया (वय 23, रा. गेवराई, जि. बीड) याच्यासह त्याला मदत करणारे संतोष नंदू सावंत व अमर हरिश्चंद्र मोरे (रा. मुळशी, जि. पुणे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना 17 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

आठ दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेतील तिन्ही आरोपींना पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. शहरातील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या होत्या. मुलींच्या नातेवाइकांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर, संदीप बडे, भाऊसाहेब खेडकर, कृष्णा बडे, संदीप कानडे व अश्विनी झिरपे यांनी विविध ठिकाणी जाऊन तपास केला होता.

यामध्ये मोबाईल सेलचे नितीन शिंदे यांच्या मदतीने मुळशी येथील डोंगर भागातून दोन मुली व तीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कापडिया हा गेवराईचा असून मोबाईलवरील मैत्रीतून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसार (पोस्को) व अत्याचार करणे, पळवून नेणे आदी कलमांनुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT