पाथर्डी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : हनुमान मंदिराचे पंचधातूचे दोन कळस चोरून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. ही घटना तालुक्यातील जागृत देवस्थान असलेल्या हनुमान टाकळी येथे शनिवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे भाविकांनी तीव्र संताप व्यक्त करीत चोरट्यांचा तपास लावण्याची मागणी केली आहे. मे महिन्यात मोठ्या दिमाखदार धार्मिक सोहळ्यात या मंदिरावर पंचधातूचे पाच कळस बसविण्यात आले होते. त्यापैकी दोन कळस चोरट्यांनी लांबविले आहेत. हे हनुमान मंदिर समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापित केलेले आहे. येथील हनुमानाची मूर्ती गोमयीन असून, हे मंदिर लोकांचे श्रद्धास्थान आहे. जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून लाखो भाविक या ठिकाणी दरवर्षी भेट देऊन हनुमानाचे दर्शन घेत असतात. त्यामुळे या ठिकाणी चोरी झाल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मंदिराच्या शिखराच्या कळसाचे काम बाकी असल्याने बांबूच्या काठ्याचा पहाड बांधलेला होता. त्याचाच आधार घेत चोरट्याने मंदिरावर जाऊन दोन कळस चोरून नेले. ही घटना शनिवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. देवस्थानचे महंत रमेश आप्पा महाराज यांनी या घटनेची माहिती तत्काळ पाथर्डी पोलिसांना दिली. त्यानंतर शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पाथर्डीचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच, ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाकडून तपासणी करून धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करून तपासाचे चक्र फिरवण्यासाठी सूचना केल्या.
दोन लाख रूपये किंमतीचा नऊ किलो वजनाचा पाच फूट उंच कळस, दीड लाख रूपये किमतीचा चार किलो वजनाचा तीन फूट उंचीचा पंचधातूचा कळस, असे दोन कळस, असा साडेतीन लाखांचा ऐवज चोरी गेल्याची तक्रार श्री समर्थ हनुमान सेवा संस्थान मंदिराचे विश्वस्त अण्णासाहेब दगडखैर यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात दिली आहे. महंत रमेश आप्पा महाराज, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, पाथर्डी बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक कुशिनाथ बर्डे यांनी या चोरीचा तपास त्वरित लावावा, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा