नगर : पुढारी वृत्तसेवा : सुमारे 100 वर्षांपुर्वी 1923 मध्ये नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर उभारलेले शासकीय विश्रामगृह आता चुकीच्या व्यवस्थापनामुळे चर्चेचा विषय बनले आहे. या ठिकाणी 'गेस्ट' थांबण्याऐवजी आता अधिकार्यांच्या शिफारशीनेच राजकीय, सामाजिक संघटनांच्या पार्ट्या रंगत असल्याचीही चर्चा आहे. त्यातच गेल्या आठवड्यातच एका बड्या नेत्याला अधिकार्यांच्या चुकीमुळे सूट राखीव असूनही नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याचे कानावर आले. असे असतानाही अधिक्षक अभियंता बावीस्कर यांचे याकडे दुर्लक्ष असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नगर येथे साडेतीन एकर जागेवर शासकीय विश्रामगृह (आयबी) बांधण्यात आलेले आहे. माजी मुख्यमंत्र्यांपासून अनेक केंद्रीय मंत्र्यांनीही या ठिकाणी मुक्काम केलेले आहेत. याच ठिकाणी शासकीय, राजकीय व सामाजिक संघटनांच्या बैठकाही होत आहेत. मात्र काही दिवसांपासून शासकीय विश्रामगृहाचे व्यवस्थापन हे पोखरले गेल्याचे चित्र आहे. कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. त्यामुळे सूट बूक करण्यापासून पाहुण्यांना प्रशासकीय 'यंत्रणे'चा भार सहन करावा लागत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे.
त्यातही अनेकदा सूट रिकामे असूनही ते देण्यास टाळाटाळ केली जाते, काही सूट राजकीय मर्जी सांभाळण्यासाठी बूक ठेवावे लागतात, अशीही व्यथा आहे. त्यामुळे सूट मिळविण्यासाठी अनेकांची परवड सुरू असते. दुसरीकडे काही संघटनांच्या पदाधिकार्यांचे, कार्यकर्त्यांचे शासकीय विश्रामगृह हे जणू निवासस्थानच बनल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे या ठिकाणी 'रात्रीस खेळ चाले' अशीच अवस्था आहे. यासाठी कार्यकारी अभियंत्यांचा आशीर्वाद असल्याचेही लपून राहिलेले नाही.
हे ही वाचा :