अहमदनगर

कर्डिलेंविरुद्धच्या गुन्ह्याला स्थगिती ; मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे आदेश

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री शिवाजी कर्डिले, त्यांचा मुलगा अक्षय कर्डिले व अन्य एकाविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाला मुख्य न्यायदंडाधिकारी सुधाकर यार्लगड्डा यांच्या न्यायालयाने स्थगिती दिली आहे. धमकावणे, शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश याआधी अतिरिक्त मुख्य न्यायाधीश माया देशमुख यांच्या न्यायालयाने दिला होता.
बुर्‍हाणनगर (ता.नगर) येथील तुळजाभवानी माता मंदिराचे पुजारी अ‍ॅड. अभिषेक भगत यांनी कर्डिले यांच्याविरोधात न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. शिवाजी कर्डिले यांच्याकडून भगत कुटुंबीयांना अनेक वर्षांपासून धमकावले जात असल्याचे फिर्यादीत म्हटले होते. तसेच, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांना शिवीगाळ करीत धमकावल्याची कथित कॉल रेकॉर्डिंग समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते.

या क्लिपमध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप अ‍ॅड. भगत यांनी केला होता. तसेच, अ‍ॅड. भगत यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन करून शिवाजी कर्डिले व अक्षय कर्डिले यांच्या विरोधात फिर्याद दिली तर ठार मारीन, अशी धमकी दिल्याचे अ‍ॅड. भगत यांनी फिर्यादीत म्हटले होते. न्यायालयाने कर्डिले त्यांचे पुत्र अक्षय व इतर एकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशावर फौजदारी पुनःनिरीक्षण अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर सुनावणी होऊन प्रकरण 'जैसे थे' ठेवण्याचा निकाल मुख्य न्यायदंडाधिकारी सुधाकर यार्लगड्डा यांनी दिला आहे. या निकालाची प्रत कोतवाली पोलिसांना प्राप्त झाल्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

SCROLL FOR NEXT