अहमदनगर

मायंबा गडावर चेंगराचेंगरी! अनेक भाविक जखमी

Laxman Dhenge

मढी : पुढारी वृत्तसेवा : श्रीक्षेत्र मायंबा येथे पाडव्याच्या पूर्वसंध्येला मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीला सुगंधी उटणे लेपनविधीसाठी राज्याच्या विविध भागातून आलेल्या भाविकांच्या गर्दीपुढे नियोजन अपुरे पडले. दर्शन रांगेतील बांधण्यात आलेले बॅरिकेड्स गर्दीमुळे मोडून पडले. चेंगराचेंगरी होऊन अनेक भाविक जखमी होऊन सुगंधी उटणे लेपन विधी अवघ्या तीन तासांत बंद करण्यात आला.
व्हीआयपींच्या नावाने प्रत्येकी एक हजार रुपये दर्शन पास दर घेतलेल्या लोकांनाही दर्शन न होताच माघारी परतावे लागले. मनोज जरांगे पाटील, डॉ. सुजय विखे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले आदी नेत्यांनाही गर्दीचा त्रास सहन करावा लागला.

श्रीक्षेत्र मायंबा येथे मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी असून, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सूर्यास्तानंतर कावडीचे पाणी पडण्यास प्रारंभ होतो. त्यानंतर उशिरा समाधी सुगंधी उटणे लेपन विधी होऊन प्रत्येक भाविकाला फक्त याच दिवशी समाधीला हस्त स्पर्श करता येत असल्याने लाखो भाविक राज्याच्या कानाकोपर्‍यातून येथे येतात. पोलिसांची अपुरी संख्या, सुरक्षारक्षकांचा अभाव व अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी आल्याने मध्यरात्रीनंतर आरडाओरड, घोषणाबाजी सुरू झाली.

त्यातच रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांचे आगमन झाल्यानंतर दर्शनरांगेतील व परिसरातील उपस्थित भाविक उत्तेजित होऊन जरांगे यांच्यापुढे उभे राहण्यासाठी गर्दी वाढली. एका बाजूने दर्शनरांग सुरू, दुसर्‍या बाजूने जरांगेंना बघण्यासाठी वाढलेली गर्दी अशा परिस्थितीत गोंधळ उडून गर्दी नियंत्रणासाठी पोलीस यंत्रणासुद्धा हतबल ठरली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी देवस्थान समितीचे प्रमुख मार्गदर्शक आ. सुरेश धस यांनी काही काळासाठी दर्शन रांग थांबविल्याचे जाहीर केले. गावापासून देवस्थानपर्यंत अरुंद व खराब रस्ता असल्यानेसुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यात्रा नियोजनासाठी देवस्थान समितीचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब मस्के, सर्व विश्वस्त कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.

लेपन विधी वेळेत बदल करा

पुढील वर्षी दुपारी बारा वाजता कावडीचे पाणी सुरू करून सायंकाळी सहा वाजता सुगंधी उटणे लेपण विधी सुरू केल्यास येणार्‍या सर्वच भाविकांना हस्तस्पर्श करत समाधीचे दर्शन घेता येईल, असे अनेक भाविकांनी मत व्यक्त केले.

परस्परांची ओळख पटणे झाले दुरापास्त!

ओल्या कपड्याने म्हणजे फक्त अर्धी चड्डी किंवा अंडरपँटवर दर्शनबारीमध्ये सुरू असलेल्या नळाखाली स्नान आपोआपच होते. अशाच ओल्या अंगाने समाधीच्या दर्शनासाठी व उटणे लेपन करण्यासाठी जावे लागते. सर्वत्र वाहनांचे पार्किंग व केवळ चड्डीवर फिरणारे भाविक अशी गर्दी दिसत असल्याने परस्परांची ओळख पटणेसुद्धा दुरापास्त झाले होते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT