नगर : पुढारी वृत्तसेवा : कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील सरासरी 4 लाख 58 हजार 636 हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. सर्वाधिक अडीच लाख हेक्टर क्षेत्र ज्वारीसाठी असेल. यंदा पाऊस कमी झाला. कमी पावसामुळे ज्वारी, कडवळ व हरभरा लागवड अधिक होण्याची शक्यता आहे. येत्या काही काळात पाऊस होऊन पाण्याची खात्री मिळाल्यास गव्हाची पेरणीदेखील वाढण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात जवळपास 7 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली. पावसाअभावी 71 महसूल मंडळांमध्ये पावसाचा तब्बल 21 दिवस खंड पडला. उर्वरित मंडळांमधील पिकेदेखील वाया जाण्याची शक्यता असताना उत्तरा नक्षत्रात जवळपास 35 टक्के पाऊस झाला. या दमदार पावसामुळे रब्बी पेरणीला दिलासा मिळाला आहे.
संबंधित बातम्या :
कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी 4 लाख 58 हजार 636 हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. त्यापैकी 2 लाख 67 हजार 834 हेक्टर क्षेत्र ज्वारीसाठी असणार आहे. यंदा 92 टक्केच पाऊस झाला आहे. कमी पावसात ज्वारीसारखे पीक घेणे परवडणारे आहे. सध्या पाण्याची खात्री नाही. त्यामुळे गव्हाची पेरणी कमी होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत दमदार पाऊस झाल्यास गव्हासह रब्बी पिकांना दिलासा मिळणार आहे.
88 हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा
यंदाच्या रब्बी हंगामात 86 हजार 405 हेक्टर क्षेत्रावर गहू, 14 हजार 118 हेक्टर क्षेत्र मका, इतर तृणधान्यासाठी 156 हेक्टर क्षेत्र निश्चित केले. हरभरा पिकासाठी 88 हजार 277 हेक्टर, इतर कडधान्यांसाठी 1 हजार 260 हेक्टर क्षेत्र आहे. करडई 361, तीळ 20, जवस 15, सुर्यफूल 31व इतर गळीत धान्यांसाठी 59, असे ए़कूण रब्बी गळीत धान्यांसाठी 486 हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे.