अहमदनगर

नगर : रमेश पवार खूनप्रकरणी अखेर सोपान राऊतला अटक

अमृता चौगुले

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील निपाणीवडगाव येथील बहुचर्चित रमेश पवार यांच्या खूनप्रकरणातील तब्बल चार महिन्यांपासून पसार असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक सोपान राऊत यांना अखेर शुक्रवारी मध्यरात्री 12ः 17 वाजता येथे अटक करण्यात आल्याची माहिती डिवायएसपी बसवराज शिवपुजे यांनी दिली. दरम्यान, राऊत यांना येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्री. खराडे यांच्यासमोर हजर केले असता 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तालुक्यातील निपाणीवडगाव येथे चार महिन्यांपूर्वी रमेश पवार या इसमाचा निर्घृण खून करण्यात आला होता.

परंतु त्यांचा झोपेत नैसर्गिक मृत्यू झाल्याचे भासविण्यात आले होते, मात्र शवविच्छेदन अहवालामध्ये सदर इसमाचा मृत्यू नैसर्गिक नसून, गळा दाबल्याने झाले वास्तव पुढे आले होते. पोलिस तपासात मृत पवार यांची पत्नी संगिता हिच्या बोलण्यामध्ये विसंगती असल्याचे लक्षात येताच प्रथमतः तिच्यासह अन्य दोघांना अटक करण्यात आली होती. यात एका साक्षीदाराचाही समावेश होता. रमेश पवार यांची हत्या पत्नी संगीता, अजय गायकवाड व प्रसाद भवार यांनी अपहरण करुन, मद्य पाजून केल्याचे उघड झाले. पोलिस तपासात या खूनामागे सोपान राऊत यांचा हात असल्याची उकल झाल्याने त्यास आरोपी करण्यात आले होते. खुनाच्या घटनेपासून चार महिने राऊत पसार होते. दरम्यान, येथील सत्र न्यायालयाने राऊत यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठामध्ये अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला होता, परंतु युक्तीवादानंतर औरंगाबाद खंडपिठाकडूनही सदर अर्ज फेटाळण्यात आला होता.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT