शहरात दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या एका २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह अखेर सापडला असून, कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गणेश विसर्जनाच्या दिवशीच उघड झाल्याने गोंधवणी परिसरात शोककळा पसरली आहे.
बेपत्ता तरुणाचे नाव महेश डोरले (वय २१, रा. वॉर्ड क्र. १, गोंधवणी रोड, श्रीरामपूर) असे आहे. तो ५ जुलै रोजी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाला होता. शनिवारी शहरातील पाटबंधारे विभागाच्या वसाहतीतील एका पडक्या खोलीत त्याचा कुजलेला मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना तब्बल चार तासांपेक्षा जास्त वेळ लागला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व सहाय्यक पोलीस निरीक्षक राम शिखरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान खोलीच्या दरवाजाला गळफास घेण्यासाठी बांधलेली दोरी आढळून आली. त्यामुळे महेशने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याने नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.