जामखेड : पुढारी वृतसेवा
कर्जत – जामखेड मतदारसंघातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न लवकर सुटणार असून, आमदार रोहित पवार यासाठी प्रयत्नशील आहेत. मंत्रालयात यासाठी विविध मंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न कायम मार्गी लावण्यासाठी धडपडत आहेत. त्यांची धडपड पाहत हा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याचे सुतोवाच केले. त्यामुळे कुकडी पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, तो आता मार्गी लागणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चौंडीत सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी खासदार पवार आले होते. यावेळी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, मंत्री दत्तात्रय भरणे, भूषणसिंहराजे होळकर, आमदार रोहित पवार, आमदार नीलेश लंके, आमदार संग्राम जगताप, आमदार बाळासाहेब आजबे, रोहित पाटील, आमदार अनिल गोटे, विश्वास देवकाते, राजेंद्र फाळके, नामदेव राऊत, राजेंद्र गुंड, कर्जतच्या नगराध्यक्ष उषा राऊत, कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, माजी सभापती सूर्यकांत मोरे, अक्षय शिंदे, चौंडीचे सरपंच सुनील उबाळे आदी उपस्थित होते.
खासदार पवार म्हणाले, पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला होता. आजपर्यंत येथील दुष्काळ हटला नाही. आमदार रोहित पवार यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पाण्याचा प्रश्न मार्गी लागला की, उद्योगधंद्यांचा प्रश्न सुटेल. कर्जत-जामखेडचा चेहरामोहरा येत्या काळात बदलणारा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा प्रभाव आमदार पवार यांच्यावर असल्याने मतदारसंघातील रस्ते, पाणी, प्रश्नसाठी प्राधान्याने सोडवत आहेत. एमआयडीसीसाठी ही विशेष प्रयत्न सुरू आहेत.
खासदार पवार म्हणाले, जिजामाता यांनी शिवाजी महाराज यांना संघर्ष करत लढायला शिकवले, तर सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची चळवळ उभी केली, तर अहिल्यादेवी होळकर यांनी कौटुंबिक संकट आले, तरी हिमतीवर राज्य उभे केले. त्यांनी हजारो मंदिरे उभारली, बारव, विहीर, घाट उभारण्याचे काम केले. त्यामुळे त्या काळात समाजामध्ये सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र आणण्याचे कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी केले. प्रशासन कसे चालवायचे याचा आदर्श अहिल्यादेवी होळकर आहेत. त्यांची कीर्ती संपूर्ण जगात असल्याचे पवार यांनी सांगितले.
आरक्षणावर बोलण्यास शरद पवार यांनी टाळले
आमदार रोहित पवार यांनी मराठा, ओबीसी, धनगर आरक्षणाबाबतीत लक्ष घालण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीची रेघ धरत मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही आरक्षणाबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लक्ष देण्याची मागणी केली; परंतु त्या मागणीकडे पवार यांनी लक्ष दिले नाही.