अहमदनगर

नगर : सोयाबीनवर चक्री भुंगा, कापसावर बोंड अळी

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात खरिपाची 117 टक्के पेरणी झालेली आहे. दमदार पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले. सोयाबीन पिकाचा 216 तर कापसाचा 125 टक्के पेरा झाला आहे. सोयाबीन पिकाला शेंगा लागल्या असून, या पिकावर चक्री भुंगा किडीचा प्रादुर्भाव झाला. काही ठिकाणी कापसाला बोंडे लागले असून, या पिकांवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तुर पिकाला देखील पाने गुंडाळणारी अळी लागली आहे. फक्त 2 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा झाला.

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाने 5 लाख 79 हजार क्षेत्र निश्चित केले होते. मात्र, 6 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. बाजरीसाठी दीड लाख हेक्टर क्षेत्र होते. फक्त 83 हजार 239 हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला. कणसात दाणे भरण्यात प्रक्रिया सुरु आहे. 86 हजार 239 हेक्टर क्षेत्रावर मका पेरली असून, पिकाला तुरे आले असून कणसात दाणे भरले जात आहेत. 36 हजार हेक्टरऐवजी 62 हजार 227 हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झालेली आहे. यंदा मुगाची पेरणी कमी झाली असून, 80 टक्के क्षेत्रावरील मुग काढला आहे.

उडदाचा पेरा 49 हजार 647 हेक्टर क्षेत्रावर झाला आहे. हे पीक काढणीच्या अवस्थेत असून, बर्‍याच ठिकाणी काढणीला प्रारंभ झाला आहे. यंदा भुईमुगाचे क्षेत्र कमी आहे. फक्त 5 हजार 315 हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला असून, पीक फुलोरा अवस्थेत आहे. 17 हजार 275 हेक्टर क्षेत्रावर भाताची पेरणी झाली.सध्या या पिकाचे फुटवे फुटण्याच्या तसेच पोटरी अवस्थेत आहे. काही ठिकाणी तपकिरी तुडतुडे दिसत आहेत. सुर्यफूल फक्त 137 तर तीळ 86 हेक्टर क्षेत्रावर पेरण्यात आले. सुर्यफुलाला फुले तर तीळ फुलोरा अवस्थेत आहे. कृषी विभागाने यंदा खरीप ज्वारीसाठी 572 हेक्टर क्षेत्र निश्चित केले होते. मात्र फक्त 2 हेक्टरवर.

37 हजार हेक्टरवर ऊसाची लागवड

जिल्ह्यात 22 साखर कारखाने आहेत. नोव्हेंबर महिन्यांत गळीत हंगाम सुरू होणार आहे. खरीप हंगामात 94 हजार 693 हेक्टर क्षेत्रावर नवीन उसाची लागवड निश्चित केली होती. मात्र, पावसाने गुंगारा दिल्यामुळे फक्त 37 हजार 231 हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झालेली आहे. दमदार पावसामुळे उसाच्या लागडीला वेग येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT