अहमदनगर

तिसगावात बंदोबस्तात रस्ता रुंदीकरण; पोलिसांचा फौजफाटा

अमृता चौगुले

करंजी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामाला बुधवारी पोलिस बंदोबस्तात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांनी सुरुवात केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यापार्‍यांनी रुंदीकरणास हरकत घेत आमच्या जागेचा रास्त मोबदला मिळाला नाही, तसेच जागा अधिग्रहित केल्यानंतर शासनाने दिलेला मोबदला कमी असून, मिळालेल्या मोबदल्याचे व्याज मिळणे आवश्यक असून ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने सुरू आहे का? असा सवाल संतप्त व्यवसायिकांनी यावेळी केला.

यावेळी व्यावसायिकांच्या वतीने सरपंच इलियास शेख, अ‍ॅड. अय्याज शेख आदींनी प्रशासकीय अधिकार्‍यांशी चर्चा केली. मात्र, महामार्ग विभागाचे अधिकारी रस्ता रुंदीकरणाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून आले. त्यामुळे काहीवेळ चर्चेतून थोडासा तणाव निर्माण झाला होता.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या उपअभियंता विद्या पवार, प्रमुख ठेकेदार बाळासाहेब देशमुख यांच्यासह पोलिस व महिला पोलिस यावेळी उपस्थित होते. वेशीपासून पुढे रस्ता रुंदीकरण सुरू झाल्यानंतर व्यावसायिकांसह ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. रस्ता रुंदीकरण सुरू होताच अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी आपापले पत्र्याचे शेड स्वतःहून काढून घेण्यास सुरुवात केली.

रस्ता रुंदीकरण महत्त्वाचे आहे. तिसगाव येथे वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून रस्ता रुंदीकरण करण्याची गरज आहे. त्यासाठी परिसरातील व्यावसायिकांसह तिसगाव ग्रामस्थांचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे.

– विद्या पवार,
उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग, पाथर्डी

न्यायालयात याचिका दाखल निवाडा होऊन तीन वर्षे उलटून गेले. व्यावसायिकांना देऊ केलेल्या रकमेचे व्याजही अद्याप मिळाले नाही. 21 ऑगस्टला नोटीस आली आणि 23 ऑगस्टला रस्ता रुंदीकरण सुरू झाले. कामासंदर्भात याचिका दाखल केली आहे.

– अ‍ॅड अय्याज शेख, तिसगाव

हेही वाचा

SCROLL FOR NEXT