नगर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील भोरवाडी येथील गौण खाणकाम व स्टोन के्रशरचा परवाना रद्द करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी गुरूवारी नगर-पुणे महामार्गावर कामरगाव येथे रास्ता रोको आंदोलन केले. मंडलाधिकारी रूपाली टेमक यांना निवेदन देऊन तातडीने याबाबत कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा मुलाबाळांसह येऊन स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आंदोलनात पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, सरपंच भास्कर भोर, उपसरपंच सुरेश जासूद, बबन भोर, नवनाथ वायाळ, भरत खैरे, देवराम माने, मारूती आंधळे, संतोष आंधळे, प्रदीप पठारे, प्रशांत साठे, कुंडलिक वाघ, अक्षय पानसरे, राहुल जाधव, प्रवीण जासूद, पद्मावती भोर, नर्मदा माने, वंदना माने, चंदा वाघ आदींसह शेतकरी व ग्रामस्थ सहभागी झाले होते. तलाठी राहुल कोळेकर यांनाही निवेदन देण्यात आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख घटनास्थळी फौजफाट्यासह उपस्थित होते.
भोरवाडी येथील गट क्र. 518/1 क्षेत्रावर संतोष बाबासाहेब शेटे, किशोर बाळासाहेब जाधव, रावसाहेब बबन शेटे, दत्तात्रय पंडितराव खैरे यांची सामायिक जमीन असून, तेथे स्टोन क्रेशर व खान पट्टा खोदण्याचे काम अनधिकृत सुरू आहे. या जागेत स्टोन क्रेशर होऊ नये, याबाबत तहसीलदार, गौण खनिज विभाग, प्रदूषण नियंत्रण विभाग व उपजिल्हाधिकारी यांना 23 ऑगस्ट 2021 रोजी शेतकरी व ग्रामपंचायतीचा ठराव करून निवेदन दिले होते. त्यावर अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही. भोरवाडी व कामरगाव या दोन्ही गावच्या शेतकर्यांचा व ग्रामस्थांचा स्टोन क्रेशरला विरोध आहे.
हुकुमशाही पद्धतीने चाललेले काम थांबवून परवाना रद्द करावा. स्टोन क्रेशरजवळील शेतकरी हे मोठ्या संख्येने आजी-माजी सैनिक असून, त्यांचा विचार करण्यात यावा. परिसरात 3 पाझर तलाव असून, त्याचा शेतकर्यांना फायदा होतो. मात्र, या स्टोन क्रेशरमुळे पाण्याची पातळी घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात, असे निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा :