अहमदनगर

नगर : ‘केदारेश्वर’ अध्यक्षपदी ऋषिकेश ढाकणे ; ठरले आतापर्यंतचे सर्वांत तरूण अध्यक्ष

अमृता चौगुले

बोधेगाव : पुढारी वृत्तसेवा : संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ऋषिकेश प्रतापराव ढाकणे यांची, तर उपाध्यक्ष पदी माधवराव भिवसेन काटे यांची मंगळवारी बिनविरोध निवड करण्यात आली. राज्यातील सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासात सर्वांत तरूण अध्यक्ष म्हणून ढाकणे हे पहिले मानकरी ठरले आहेत. केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मागील महिन्यात बिनविरोध झाली. कारखाना कार्यस्थळावर मंगळवारी (दि.20) सकाळी 11 वाजता अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक झाली.

अध्यक्षपदासाठी ऋषिकेश ढाकणे यांच्या नावाची सूचना संचालक पांडुरंग काकडे यांनी मांडली. त्यास शिवाजी जाधव यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी माधव काटे यांच्या नावाची सूचना सदाशिव दराडे यांनी मांडली. त्यास ऋषिकेश ढाकणे यांनी अनुमोदन दिले. दोघांचेच अर्ज असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पी. एच. लोखंडे, सहाय्यक अधिकारी बी. बी. सोनवणे, आवारे, विखे यांनी ढाकणे व काटे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.

निवडीनंतर झालेल्या सत्कार समारंभात बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे म्हणाले, ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री कारखान्याचे संस्थापक बबनराव ढाकणे यांनी अतिशय कष्टातून या कारखान्याची उभारणी केलेली आहे. त्यानंतर प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करीत अ‍ॅड.प्रतापराव ढाकणे यांनी कारखान्याला उर्जितावस्था निर्माण करून दिली. त्यांनी कारखान्याच्या व सभासदांच्या हितासाठी अक्षरशः रक्ताचे पाणी केले. मात्र, कारखाना विकू दिला नाही. प्रस्थापितांनी संधी मिळेल, त्यावेळेस या संस्थेला अडचणीत आणून या भागातील शेतकरी ऊस उत्पादक व सभासदांची पिळवणूक केली. हे मी कधीच विसरू शकणार नाही. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत कारखान्याच्या हितासाठी काम करत राहील. अतिशय कमी वयात एवढ्या मोठ्या संस्थेची जबाबदारी दिल्याबद्दल त्यांनी सभासदांचे आभार मानले.

केदारेश्वर हा ऊसतोडणी मजूर सभासदांचा साखर कारखाना आहे. त्यामुळे इथे कोणताही निर्णय घेताना सामान्य सभासदांना डोळ्यापुढे घेऊन संस्था व त्यांच्या हिताचे निर्णय निश्चितपणे घेईल. सभासदांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही, अशी ग्वाही अध्यक्ष ढाकणे यांनी दिली. यावेळी माजी अध्यक्ष व संचालक प्रतापराव ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन कुमार घोळवे, प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे , प्रशासकीय अधिकारी पोपट केदार , यांच्यासह सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी व समर्थक उपस्थित होते सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केली तर आभार संचालक तुषार वैद्य यांनी मानले.इथेनॉल प्रकल्प उभारणी लवकरच
केदारेश्वर कारखान्यासंदर्भात अनेक चांगले निर्णय भविष्यात आपल्याला घ्यायचे आहेत. इथेनॉल उभारणीचा प्रकल्प लवकरच सुरू होणार असून, त्यासोबतच उपपदार्थ निर्मिती संदर्भातही आपण वाटचाल सुरू करणार आहोत, असे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

SCROLL FOR NEXT