अहमदनगर

नगर : नावाजलेल्या मल्लांची रंगणार दंगल; स्पर्धेची संपूर्ण तयारी पूर्ण

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा

छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेची संपूर्ण तयारी झाली असून, नगर शहर येणार्‍या मल्लांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. राज्य भरातून जवळपास एक हजार मल्ल येणार असल्याने मोठ्या मल्लांची दंगल पाहण्याची पर्वणी नगरकरांना मिळणार असल्याचे जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांनी पुढारीला सांगितले. लांडगे म्हणाले, या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य पंच परिषदेचे पंच येणार असून, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर येथील मल्ल सहभागी होणार आहेत.

गुरवारी (दि. 26) सकाळी वजन होणार, यानंतर सर्व मल्लांची मेडिकल चाचणी घेण्यात येणार आहे. प्रेक्षकांसाठी सभामंडप तयार झाला आहे. या स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या आखाड्याचे पूजन सोमवारी झाले असून, शहराच्या स्थापना दिनी छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामने रंगणार असल्याचे स्पर्धेचे स्वागताध्यक्ष किरण काळे यांनी सांगितले. अनेक वर्षांनंतर वाडिया पार्क स्टेडियमच्या भव्य मैदानात कुस्त्यांची दंगल पार पडणार असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आयोजिलेल्या स्पर्धेची तयारी किरण काळे यूथ फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे.

किरण काळे म्हणाले, स्पर्धेसाठी राज्याच्या कानाकोपर्‍यांतून मल्ल येणार असून, पुरुष मल्लांच्या निवासाची व्यवस्था लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात, तर मुली व महिला मल्लांच्या निवासाची व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल आवारातील क्रीडा होस्टेलमध्ये असणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पंचांची खासगी ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, विद्यार्थी काँग्रेस जिल्हा प्रभारी अनिस चुडिवाला, काँग्रेस क्रीडा विभाग जिल्हाध्यक्ष तथा प्रवीण गिते, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे परिश्रम घेत आहेत.

संयोजन सल्लागार समिती पदाधिकारी

संयोजन सल्लागार समिती प्रमुखपदी पै. सुभाष लोंढे, सहप्रमुखपदी पै. हर्षवर्धन कोतकर यांची निवड करण्यात आली, तसेच समितीत ज्येष्ठ कुस्तीपटू, किरण काळे यूथ फाउंडेशन, जिल्हा तालीम संघाच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील छोरीयां कम है के?

छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेत मोठ्या प्रमाणात मुली-महिला मल्लांचा समावेश असणार आहे. पुरुष मल्लांबरोबर महिला मल्लांच्याही कुस्तीचे सामने बघायला मिळणार आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांतून मुली-महिला विविध गटांत आपले डावपेच अजमावणार असून, पुरुषांच्या बरोबरीने महिलाही या कुस्ती आखाड्यात झुंझणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT